शहरातील ५१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना मिळाला दिलासा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. तब्बल १७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे तालुक्यात सध्या कोरोना ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान एका कोरोना बाधित महिलेचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात ती कोरोनाचा पहिला बळी ठरली आहे. शुक्रवारला ५१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना थोडाफार दिलासा मिळाला असून ३७ नमुन्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. कोरोना या आजाराने आता ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे.
तालुक्यात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असल्याने शहरवासियांमध्ये थोडी भीती थोडे समाधान पाहायला मिळत आहे. २० जूनला शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्यताने वाढत गेली. दरम्यान शहराबरोबरच ग्रामीण भागातही या आजाराने पाय रोवल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढून २४ वर पोहचला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसा गणिक वाढत असल्याने शहरात कोरोनाचे उग्ररूप पाहायला मिळत असतांनाच १७ रुग्ण त्यातून पूर्णपणे बरे झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना हा साथीचा आजार धोकादायक असला तरी योग्य वेळी त्याचे निदान झाल्यास व रुग्णानाने योग्य उपचार घेतल्यास तसेच उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आकड्यावरून पाहायला मिळत आहे. तालुक्यात सात कंटेन्टमेंट झोन तयार करण्यात आले. त्यापैकी दोन कंटेन्टमेंट झोन मोकळे करण्यात आले. सेवानगर हा देखील सुरुवातीच्या साखळीतील कंटेन्टमेंट झोन असून याठिकाणी २७ जूनला एक महिला कोरोना बाधित आढळली होती. याठिकाणी रोज मजुरी करणारा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात राहात असून रोजंदारीवरच त्यांची गुजराण चालत असल्याने त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून मोकळे होण्याचे वेध लागले आहे. कोरोना बाधित महिलेनंतर सेवानगर परिसरात बराच कालावधी उलटूनही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने तेथील नागरिक सेवानगर परिसरातील कंटेन्टमेंट झोन कधी मोकळा होतो याकडे नजारा लावून बसले आहेत. प्रशासनाने उत्तम परिस्थिती हाताळल्याने कोरोनाचे भयावह रूप अद्याप तरी वणी तालुक्यात पाहायला मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये बऱ्यापैकी समाधान पाहायला मिळत आहे. नागरिकांनी बाजारात वर्दळ होणार नाही याची दक्षता घेऊन शहराला कोरोनमुक्त करण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.