बहुजन समाज पार्टी तर्फे राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर मशीन भेट
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना या संसर्गजन्य आजाराने शहराबरोबरच ग्रामीण भागातही एन्ट्री केली असून २१ जुलैला राजूर (कॉलरी) येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर राजूर व आसपासच्या गावांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन व प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असतांना यात आपलेही काही योगदान असावे या उदात्त हेतूने बहुजन समाज पार्टीच्या स्थानिक शाखे तर्फे राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली.
कोरोना या वैश्वीक महामारीने गाव पातळीवरही आपले जाळे तयार केले असून येथील नागरिक भीतीच्या सावटात वावरत आहे. २१ जुलैला राजूर (कॉलरी) येथील नागपूरला उपचारार्थ गेलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गाव खेड्यातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची जास्त भीती असते. त्याच प्रमाणे ग्रामीण भागात रोजंदार, शेतकरी, शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने ते कोणत्याही खबरदारीच्या नियमांना गांभीर्याने घेत नाही. सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर व मास्क हे कोरोनाचे संक्रमण रोखण्या करीता शासनाने अमलात आणलेले नियम असून नागरिकांनीही कोरोनाची लागण होऊ नये याकरिता या नियमांचे पालन करणे आवश्यक असतांना देखील काही अविचारिक नागरिक याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात. विना मास्क गाव शहरात फिरून व सोशल डिस्टन सिंगच्या नियमांची पायमल्ली करीत काही महाभाग आपल्या निर्बुद्धीचे दर्शन घडवतात. त्यांचा हा दुर्लक्षितपणा कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा करीता येणाऱ्या नागरिकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांचा हातस्पर्श होत असल्याने त्यातून कोरोनाचे संक्रमण होऊ नये याकरता येथे येणाऱ्या प्रत्येकाचे सॅनिटायझरीन व्हावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला बहुजन समाज पार्टी तर्फे सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकांचा एकमेकांना हतस्पर्श होत असून यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच नागरिकांच्या व आरोग्य सेवकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये हा या मागचा हेतू असल्याचे बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.