WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, कुंभा येथील पुरुषाला झाली कोरोनाची लागण !

ImageImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना विषाणूने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला असतांनाच मारेगाव तालुक्यातही कोरोना विषाणूने आपले पाय रोवले असून आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. राजूर (कॉलरी) येथील पॉझिटिव्ह महिलेच्या जवळच्या संपर्कातील एका पुरुषाचा आज कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह महिलेला भेटण्या करिता गेलेल्या १४ व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते त्यापैकी १३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तर एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मारेगाव तालुक्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.

कोरोना या साथीच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले असतांना झरीजामणी व मारेगाव तालुका बराच काळ कोरोनमुक्त राहिला. झरीजामणी तालुक्यातील महादापूर येथे ३ जुलैला गर्भवती महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर आज मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावातील एका पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राजूर (कॉलरी) येथील महिला नागपूर येथे उपचारासाठी गेली असता तिचा २१ जुलैला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तिला भेटण्याकरिता गेलेल्या मारेगाव तालुक्यातील १४ व्यक्तींना ट्रेस करून संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले व त्यांचे नमुने तपासणी करीता पाठवण्यात आले. आज त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १३ व्यक्ती निगेटिव्ह तर कुंभा येथील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मारेगाव तालुक्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली असून कुंभा गावाबरोबरच संपूर्ण मारेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात येत आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीला उपचाराकरिता यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असतांना देखील कोरोनाचे जाळे गाव शहरांमध्ये पसरतच चालले आहे. राजूर येथील कोरोना संक्रमित महिलेच्या संपर्कात आलेल्यांमुळे मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचे संक्रमण असेच चोर पावलांनी होत असून नंतर हा आजार इतरत्र पसरून उग्ररूप धारण करतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना अंगीकारून स्वतःची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. कोरोनाची पाळेमुळे खणून काढण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून कोरोनाला पराभूत करण्याकरिता नागरिकांचेही सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटावर मात करण्याकरिता एकजुट दाखवून प्रशासनाच्या प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share