दोन दिवसात ८१ अहवाल निगेटिव्ह आल्याने, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असले तरी या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरेही होत आहेत. तब्बल १७ रुग्ण या आजारातून बरे झाले असून एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर स्थिरावली आहे. काल २४ जुलैला ५१ जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते तर आज २५ जुलैला आणखी ३० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच शहरवासियांमध्येही समाधान पाहायला मिळत असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याने व दोन दिवसांत ८१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाची कोरोनमुक्त शहराकडे वाटचाल सुरु झाली आहे तर नागरिकांसाठी हि एकूणच दिलासादायक बाब आहे.
तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले असतांना दोन दिवसात ८१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने व १७ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सतत कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्येही चांगलीच धास्ती निर्माण झाली होती. परंतु कोरोना नियंत्रित असल्याच्या शुभ वार्ता त्यांच्या कानी पडत असल्याने त्यांच्यात एकूणच समाधान पाहायला मिळत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची योग्य दक्षता घेतल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यांनी उच्चांक गाठला नाही. एका दिवशी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची शहरात नोंद आहे. शहरात अजूनही एका दिवसात तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले नाहीत. प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन योग्य परिस्थिती हाताळल्याने रुग्णांच्या संख्येने अद्याप तरी उच्चांक गाठला नाही. एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला हा एकच दुःखदायक प्रसंग तालुक्यावर ओढवला आहे. अन्यथा कोरोनावर प्रशासनाबरोबरच १७ रुग्णांनी यशस्वीपणे मात केली आहे. तालुक्यात २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटून सहावर आली आहे.