कोलार येथील खेतान प्रा.ली. या व्हाल्वो कंपनीत परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढली
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाने दहशत निर्माण केली असून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरातील कोरोनाची लाट ग्रामीण भागापर्यंत पोहचली असून प्रत्येक जीव भीतीच्या सावटात वावरत आहे. तालुक्यात कोरोनाचं जाळ घट्ट होत असतांनाच काही कोळसा खदानींशी निगडित असलेल्या खाजगी कंपन्या बेजाबदारीची सीमा पार करीत असल्याचं विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोलार मधील खेतान प्रा.ली. ही व्हाल्वो कंपनी बेजाबदारीचा कळस गाठतांना दिसत आहे. या कंपनीतील इंचार्जसह काही कामगार परप्रांतातून आल्यानंतरही कोणतीही तपासणी व खबरदारीच्या नियमांचे पालन न करता थेट कर्तव्यावर रुजू होऊन इतर कामगारांच्या संपर्कात येत असल्याने तेथील अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परप्रांतातून आल्यानंतर कोविड केयर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी करून क्वारंटाईन राहणे अनिवार्य असतांना या व्हाल्वो कंपनीतील इंचार्ज स्वतःसह आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती दडवून ठेवत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात टाकत असून प्रशासनांच्या नियमांची पायमल्ली करतांना दिसत आहे. "कंपनी अपनी है, कोण क्या कर लेगा" अशा प्रकारची भाषा हरियाणा मधून आलेला तो इंचार्ज वापरत असल्याने अन्य कर्मचारी दहशतीत आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व हरियाणा येथून सतत कर्मचाऱ्यांचे आगमन सुरु असून आतापर्यंत ४० कामगार याठिकाणी परप्रांतातून आले असून काही कामगारांना १० ते १२ दिवसांपासून खोकल्याचा त्रास असल्याची विश्वसनीय माहिती आहे. खबरदारीचे कोणतेही नियम याठिकाणी पाळले जात नसून पूर्णतः मनमानी कारभार सुरु आहे. वेकोलि प्रशासनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. खदानीचे विस्तारीकरण जलद होऊन प्रॉडक्शन अति शीघ्र कसे वाढवता येईल या प्रयत्नात वेकोलि प्रशासन व खेतान कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत असून शासनाच्या खबरदारीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतांना दिसत आहे. खेतान प्रा.ली. या व्हाल्वो कंपनीत थर्मल स्कॅनिंग मशीन तर सोडाच साधे सॅनिटायझरही कर्मचाऱ्यांच्या हातावर पडत नाही. कोणताही इंचार्ज लेव्हलचा व्यक्ती मास्क लावतांना दिसत नाही. इतर कर्मचाऱ्यांशी जवळून संवाद साधतांना मास्क वापरण्याचे नियमही पार पडले जात नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. कामावरून काढण्याच्या भीतीने येथील स्थानिक कर्मचारीवर्ग आरोग्याशी तडजोड करीत असून तक्रार तर दूरच व्यवस्थापनाविषयी ब्र शब्धही त्यांच्या मुखातून बाहेर पडतांना दिसत नाही. नाव न प्रकाशाची करण्याच्या अटीवर तेथीलच एका कर्मचाऱ्याने हा गंभीर प्रकार उघडकीस केला आहे. दररोज या व्हाल्वो कंपनीत छुप्या मार्गाने ५ ते ६ परप्रांतीय कामगार दाखल होत असून या गंभीर बाबीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास रिलायन्स सिमेंट कंपनीची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. बाहेरून आलेल्यांमुळेच शहरात कोरोना दाखल झाला असून परठिकाणांवरून भ्रमण करून आलेल्यांमुळे कोरोनाचे संक्रमणही वाढले आहे. येथील नागरिक नियमांचे पालन करूनही कोरोनाशी झुंजतांना दिसत आहे. त्यामुळे खेतान प्रा.ली. या कोलार कोळसा खदानीशी निगडित असलेल्या व्हाल्वो कंपनीत परप्रांतातून येणाऱ्या कामगारांमध्ये एखादा कामगार कोरोना बाधित निघाल्यास इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात ठेऊ नये याकरिता या कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश प्रशासनाने या कंपनी व्यवस्थापकांना देण्याची आग्रही मागणी या ठिकाणी काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमधून होत आहे.