तालुक्यातील आणखी एक रुग्ण कोरोनातून मुक्त, सक्रिय रुग्णांची संख्या झाली १३
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना या साथीच्या रोगाने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाय पसरले असून राजूर (कॉलरी) नंतर चिखलगाव ग्रामीण क्षेत्रातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ होतांना दिसत आहे. काल ३० जुलैला एकाच दिवशी तालुक्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एका दिवसातील रुग्ण संख्येचा हा उच्चांक ठरला आहे. शहरातील तेलीफैल हा दाटीवाटीचा असलेला परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू बनला असून या परिसरात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने शहरवासीयांबरोबरच प्रशासनही चिंतेत पडले आहे. दोन चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने या परिसरात प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावहीन ठरत असल्याचे एकूणच कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. हल्ली या परिसरातून कोरोना सस्पेक्ट असलेली महिला २२ जुलैला नजर चुकवत चिखलगाव येथे मायतीला जाऊन आली. त्यानंतर २६ जुलैला ती पॉझिटिव्ह निघाली. हीच महिला शेतमजूर म्हणून अन्य महिलांसोबत शेतामध्ये काम करावयास ऑटोने जात होती. एकाच ऑटोमध्ये सर्वच महिला जात असल्याने कोरोना सांक्रमण वाढण्यास या काही बाबी कारणीभूत ठरत आहे. काल या परिसरात महिला व पुरुष पॉझिटिव्ह आढल्यानंतर आरोग्य सेवक त्यांना कोविड केयर सेंटर मध्ये हलविण्यास गेले असता तेथे मोठ्या संख्येने महिला एकत्रित आल्या व प्रतिबंधित क्षेत्र हटविण्या संदर्भात एकच कल्लोळ करू लागल्या. अशा प्रकारे मोठ्या संख्येने एकत्रित आलेल्यांमुळेही कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासन कितीही कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असेल तरी नागरिकांचा बेजबाबदारपणा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरून कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे.
असे असले तरी शहरात खरेदीकरिता होत असलेली गर्दी लक्षात घेता शहरातील बाजारपेठेच्या वेळेत आणखी बदल करण्यात आला असून शनिवारपासून सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यासायिक प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यास प्रशासनातर्फे मुभा देण्यात आली आहे. आधी नेमून देण्यात आलेल्या १० ते २ या ४ तासांच्या अपुऱ्या वेळेत खरेदीकरिता नागरिकांची झुंबड उडत असल्याने बाजारपेठेची वेळ वाढविण्यात आली असून सुधारित वेळेनुसार सकाळी ६ ते साय,५ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु राहणार आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ३६ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ वर आली आहे. २२ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागपूर येथे उपचार घेत असलेली महिलाही उपचाराअंती कोरोनातून बरी झाली असून सध्यस्थितीत १३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कुंभा येथील पॉझिटिव्ह निघालेला व्यक्ती नागपूर येथे उपचार्थ दाखल असलेल्या महिलेचा भाऊ असून दोन दिवसा आधी तो मारेगाव कोविड केंद्रातून पळून गेला होता. पळसोनी कोविड केयर सेंटर मध्ये ८४ व्यक्ती विलीगीकरणात असून १० पॉझिटिव्ह रुग्णांवर येथेच उपचार सुरु आहे. तर ३ व्यक्तींवर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. तालुक्यात एकूण प्रतिबंधित क्षेत्र पाच आहेत. एकूण १८२ संशयितांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे अजून बाकी आहे. प्रशासन कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.