मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींकडे लक्ष द्या !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वयात येणाऱ्या पाल्यांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष त्यांच्या आयुष्याची दुर्गती करण्याचे कारण बनत असून पालक व पाल्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे वयात येणारी मुले चुकीच्या मार्गाकडे भरकटतांना दिसत आहे. बालपणातील संगोपनाची जबाबदारी कशीबशी पार पडल्यानंतर मुले समजदार व्हायला लागली की जबाबदारी मुक्त झाल्यागत त्यांच्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने मुले चुकीच्या वळणावर जातांना दिसत आहे. मुले वयात येऊ लागली की त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, परंतु रोजगार व नोकरीच्या निमित्ताने व्यस्थता दर्शवित कुटुंब प्रमुखांचा कुटुंबाशी संवाद साधल्या जात नसल्याने कुटुंबाची दुरावस्था होत असल्याचे अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. रोजगार, नोकरी व व्यवसायात गुरफटल्या जाऊन कुटुंबासाठी जराही वेळ दिल्या जात नसल्याने मुले ध्येय चुकत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुले मोठी होऊ लागली की त्यांच्या प्रति आपली जिम्मेदारी संपली, ही पालकांची मानसिकता बनली असल्याने मुले आयुष्याचे मार्ग चुकतांना दिसत असून विशेषतः मुली मार्ग चुकून अंधकारमय वाटेकडे जातांना दिसत आहे. वयात येणाऱ्या मुलींकडे विशेष लक्ष देण्याऐवजी पालकांकडून त्यांच्यांशी साधा संवादही साधला जात नसल्याने त्यांच्यात नैराष्याची भावना निर्माण होऊन त्या कुणाच्याही भुलथापांना बळी पडतांना दिसत आहे. बालपण बोचरं असलं तरी वयात आल्यानंतर त्यांना मायेची उब देणे आवश्यक असते. मुली समजदार झाल्यानंतर त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना योग्य संस्कार देणे आवश्यक असतांनाच त्यांच्यात आपुलकी निर्माण करून प्रेमळ मार्गदर्शन करण्याचीही तेवढीच आवश्यकता असते. त्यांना कुटुंबाकडून प्रेम मिळत नसल्याने त्या कुणाच्याही स्वार्थी प्रेमाचा शिकार बनत असल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. तेंव्हा मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुला मुलींकडे लक्ष द्या! शाळा, कॉलेज, गल्ली मोहल्ल्यात अपप्रवृत्तीची गिधाड शिकारीच्या शोधात फिरत असतात, मायेनी तुटलेल्या व अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नसलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी जवळीक साधून, खोट्या प्रेमाची भुरळ घालून, आमिषे प्रलोभने देऊन त्यांना पूर्णतः ही गिधाडं आपल्या जाळ्यात ओढतात, मग या मुली कुटुंबाशीही फारकत घेण्याची तयारी दर्शवून कुटुंबा विरुद्धच बंड करायला तयार होतात. तेंव्हा पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलींना विश्वासात घेऊन आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधने नितांत गरजेचे आहे.
पालकांचे कुटुंबाकडे होत असलेले दुर्लक्ष व मुलांचे न होणारे योग्य संगोपन यातून मुलांची होणारी उपेक्षा मुलांचे मार्ग चुकण्यास कारणीभूत ठरत आहे. कौटम्बिक कलह, व्यसनाधीनता, व्यभिचारी प्रवृत्ती, गरजांची न होणारी पूर्तता, चिडचिडी प्रवृत्ती, शुल्लक कारणांवरून होणारे वाद, न साधणारा सुसंवाद, समन्वयाचा अभाव या सर्व बाबी मुलांच्या अधोगतीचे कारण बनत असतात. या सर्व बाबी बालपणापासूनच त्यांच्या मनावर रुजल्या जातात. मग त्यांच्यावर योग्य संस्कार होत नसल्याने व कुटुंबाचे प्रेम मिळत नसल्याने तरुण पिढी असंगताशी संगत करून आयुष्याचा खराबा करतांना दिसत आहे. शाळा कॉलेजांमध्ये जाणाऱ्या हुशार देखण्या मुली क्षणिक प्रेमाला बळी पडून अपप्रवृतीच्या टवाळखोर तरुणांच्या नांदी लागून आयुष्याची राखरांगोळी करून घेतांना दिसत आहे. कुटुंबाकडून पूर्ण न होणाऱ्या अवास्तविक गरजा व इतरांसारखे राहणीमान अंगिकारण्याची ओढ याही गोष्टी मुलींना चुकीच्या मार्गाकडे नेण्यास कारणीभूत ठरत आहे. टवाळखोर व टार्गट मुलांकडून सारखा पिच्छा पुरविण्यात येऊन तसेच आपले स्वार्थी प्रेम त्यांना पटवून देण्यास जीवाचा आटापिटा करण्यात येऊन त्यांना महागड्या भेट वस्तूंची भुरळ घालण्यात येत असल्याने त्या अलगद त्यांच्या जाळ्यात अडकल्या जातात. तर काही मुली त्यांचा विरोध करून थकल्यानंतर व घरातील परिस्थिती त्यांची तक्रार करण्यायोग्य नसल्यानं नाईलाजास्तव या टवाळखोरांच्या तकलादू प्रेमांना बळी पडतांना दिसत आहे. काही अपप्रवृतीच्या तरुणांनी तर मुलींना जाळ्यात ओढून त्यांची दलालांमार्फत विक्री करण्याचा धंदाच सुरु केला आहे. आपल्या खोट्या प्रेमाची मोहिनी टाकल्यानंतर मुली मुठीत आल्या की, काही मुलींचा गैरफायदा घेण्यात येतो तर काही मुलींची सर्रास विक्री केली जाते. शिक्षणात रममाण असणाऱ्या मुली मार्ग भटकून या टार्गट मुलांच्या भूलथापांना बळी पडून कुटुंबाशी बंड करून पळून जाऊन अकाली संसारिक जीवन ओढवून घेतात. त्यानंतर डोळ्यावरची प्रेमाची झालर ओसरली की संसाराचे चटके झोम्बू लागतात व प्रियकर पती म्हणून किती योग्य आहे, याची प्रचिती आयुष्य उध्वस्त झाल्यावर मुलींना येते. मोबाईल इंटरनेट वरून पसरविले जाणारे प्रेमाचे संदेश व टीव्ही मालिकांमधून दाखविले जाणारे स्त्री पुरुषांच्या प्रेमसंबंधाचे भडक दृश्य पाहून नटिंसारखं आयुष्य जगण्याच्या नादात नंतर मुलींची चांगलीच फरफट होतांना दिसते. जीवनात चुकीचे पाऊल उचलल्यानंतर काही मुलींना घर नशीब होते तर काही मुलींना प्रियकररुपी पतीचे अत्याचार सहन करून नशिबाला कोसत जीवन कंठावे लागते. त्यानंतर काही मुली जीवनातूनच मुक्त होण्या इतपत निर्णय घेतात तर काहींना हे प्रियकररूपी राक्षस जीवनातून संपविण्याचा प्रयत्न करतात. कित्येक मुलींना प्रेमसंबंधातून आपले जीव गमवावे लागले. शहर व तालुक्यातही शाळा, कॉलेज, गली मोहल्ल्यातील मुली या टार्गट मुलांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. फूस लावून पळवून नेल्यानंतर काही मुलींचा शोध लागतो तर काही मुली पळऊन नेण्याच्या बेतात असतांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावल्या जातात. पोलीस नेहमी मुलामुलींच्या प्रेमसंबंधाविषयी अथवा त्यांच्या पळून जाण्याच्या बेताविषयी माहिती ठेऊ शकत नाही, तेंव्हा मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्यरीत्या जोपासा, त्यांची काळजी घ्या, त्यांना आपुलकी प्रेम द्या, त्यांच्याशी सुसंवाद साधा, त्यांची विश्वासात घेऊन आस्थेने विचारपूस करा. तुमच्या योग्य मार्गदर्शनानेच आजची वयात येणारी मुलं उद्याचे जिम्मेदार नागरिक बनतील.