WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील दोन रुग्ण कोरोनातुन बरे झाले तर काल एका व्यक्तीला झाली कोरोनाची लागण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून रुग्णसंख्या वाढीला खीळ बसली आहे. तालुक्यातील कोरोनाची लाट ओसरू लागली असून आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल मोनिनपुऱ्यातील जिल्हा कारागृहात क्वारंटाईन असलेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ५ झाली आहे. ४० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्हा तुरुंगात तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून परिवारातील सर्वच सदस्य निगेटिव्ह निघाले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्ती २१ जुलै पासून यवतमाळ तुरुंगात असल्याने तसेच त्याचा परिवाराशी व परिसराशी मागील १७ दिवसांपासून कोणताही संबंध न आल्याने परिसराला कंटेन्टमेंट झोन घोषित करण्यात आले नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी दिली आहे.

स्थानिक मोमीनपुऱ्यातील पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती २६ जूनला दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपी असून जामीन न मिळाल्याने त्याला व अन्य २९ जणांना तुरुंगवासात पाठविण्यात आले होते. सदर व्यक्ती गंभीर जख्मी असल्याने त्याला आधी चंद्रपूर येथे उपचार्थ दाखल करण्यात आले होते. नंतर २१ जुलैला त्याला यवतमाळ जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. तुरुंगवासात क्वारंटाईन असतांना तपासणी दरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो मागील १७ दिवसांपासून यवतमाळ जिल्हा कारागृहात असल्याने प्रशासनाने मोमीनपुरा परिसरातील तो राहात असलेला भाग सील न करता त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यात परिवारातील सर्वच सदस्य निगेटिव्ह आढळून आले. शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून तेलीफैलात हौदोस घातलेल्या कोरोना संक्रमणालाही लगाम लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसात २१६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मागील तीन दिवसांत ९४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २७९ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. सध्या स्थितीत ४३ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात भर्ती आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० झाली असून त्यापैकी ३४ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. तीन रुग्ण कोविड केयर सेंटरला तर दोन रुग्ण यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल आहेत. चार कंटेनमेंट झोन ऍक्टिव्ह असून एक शहरात तर तीन ग्रामीण भागात आहे. एकूणच शहर व तालुक्यातील कोरोनाची दहशत कमी झाली असून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे जाणवत आहे. शहर कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असून आजच्या रुग्णाला पकडून दोन रुग्ण कोरोनमुक्त होणे बाकी राहिले आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्या करिता शर्थीचे प्रयत्न चालविले असून नागरिकांनीही योग्य सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share