खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून मिळाला जामीन
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील योगेश गहुकर खून प्रकरणातील आरोपी सुशांत पुनवटकर याला नागपूर हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपी सुशांत याला सत्र नायालयाने जामीन नाकारला होता. त्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात जामिन मिळण्याकरिता याचिका दाखल केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी सुशांतचा नियमित जामीन मंजूर केला आहे.
शहरातील योगेश गहुकर हा १ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी घरून बाहेर पडला तो सायंकाळ पर्यंत घरी परतला नसल्याने घरची मंडळी चिंतेत आली. सायंकाळी वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. यादरम्यान २ नोव्हेंबरला मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या मृतदेह आढळून आला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,२०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपासा दरम्यान योगेशने राजेश रामकृष्ण भोंगळे याच्या कडून काही रक्कम उसनवारीने घेतल्याचे निष्पन्न झाले. योगेश रक्कम परत करण्यास टाळाटाळ करी असल्याने राजेश भोंगळे याने सुशांत पुनवटकर याच्या मदतीने योगेशची मनधरणी करून त्याला मारेगाव हद्दीत नेले व तेथे दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी दोघांनाही खुनाच्या आरोपाखाली अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्या मार्फत नागपूर खंडपीठात जमानत याचिका दाखल केली. बचाव पक्षाच्या वकिलाने या खून प्रकरणाचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने सुशांत पुनवटकर या आरोपीचा नियमित जामीन मंजूर केला आहे.