परतीच्या वाटेवर असलेल्या कोरोनाचा तालुक्यात मुक्काम वाढला !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण देश हादरवून सोडला असतांनाच हा आजार जिल्हा पातळीवरून आता गाव खेड्यांपर्यंतही पोहचू लागला आहे. शहरांबरोबरच गाव खेड्यातील जीवनमानही या आजाराने प्रभावित केले आहे. गुण्यागोविंदाने नांदणारी गाव खेड्यातील संस्कृती दहशतीच्या वातावरणात आली आहे. कोरोनाने शहर व तालुक्यात लुकाछुपीचा खेळ सुरु केला असून अदृश्य होत असतांनाच तो अचानक डोके वर काढून बेसावध जनतेला पछाडत आहे. आधी पॉझिटिव्ह हा शब्द व्यक्तीमधील उत्साह वाढविण्याकरिता किंवा नैराशेच्या सावटात वावरणाऱ्या व्यक्तीचे मनोबल वाढविण्याकरिता वापरला जायचा. परंतु आता पॉझिटिव्ह हा शब्द कानावर पडला की थरकाप सुटून अंगावर काटे येतात. पॉझिटिव्ह या शब्दाचा अख्खा अर्थच बदलून गेला आहे. आता बी पॉझिटिव्ह महटले की, कुणी व्यक्ती पॉझिटिव्ह आली काय अशी विचारणा होते. कोरोनाने जीवन जगण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यांवर नैराशेचे वादळ घोंगावतांना दिसत आहे. कधी जाईल हा कोरोना, कधी येईल जीवन पूर्व पदावर या विवंचनेत जीवनमान सुरु असतांना जनतेचा भ्रमनिरासच होतांना दिसत आहे. कारण हा आजार बळावतच चालला असून या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न कुचकामी ठरत आहे. कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असतांना एकाएक ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाचा मुक्काम वाढला आहे. कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या तेलीफैल परिसरातील साखळी खंडित झाल्याचे वाटत असतांनाच या परिसरात दवाखाना असलेला डॉक्टर पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे कोरोनाची नव्याने साखळी तयार झाली. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या महिलेने घोन्सा येथे आमंत्रित केलेला कोरोना वाढून आणखी चार व्यक्तींना या विषाणूची लागण झाली आहे. तर गणेशपूर येथे पॉझिटिव्ह आलेल्या महिलेने नवीन कोरोनाची साखळी तयार केली आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ४७ वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. १० ऑगष्टला नागपूर येथे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर २२ जुलैला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात दोन कोरोना बळींची नोंद झाली. ३८ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून सहा कोविड केयर सेंटरमध्ये तर एक व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहे. तालुक्यात एकूण सात कंटेनमेंट झोन झाले असून २ शहरात तर ५ ग्रामीण भागात आहेत. एकूण ४२ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात भरती आहेत. ११ ऑगस्टला एकूण २७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात ५ पॉझिटिव्ह तर २२ अहवाल निगेटिव्ह आले. त्याचप्रमाणे १० रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ९ निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत ३०२ अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ८५ नमुन्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतांना एकच पाऊल पुढे थकणे बाकी होते, परंतु काल एकाएकी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तर नागरिकांच्या मनातही भीतीने घर केले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.