लॉकडाऊन काळातील वीजबिले कमी करण्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय नाही !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना लॉकडाउनच्या काळात चार भीतीत कोंडल्या गेलेल्या जनतेवर विद्युत विभागाची अवकृपा होऊन त्यांच्यावर अवाढव्य लादलेल्या वीजबिलांवर अद्यापही कोणताच तोडगा न निघाल्याने नागरिक चिंतेत आले असून वीजबिल भरण्याकरिता पैशाची जुळवाजुळव करतांना नागरिकांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. वीज कार्यालयातील अधिकारीवर्गाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसून वीजबिल अगदी योग्य आहे ते तुम्हाला भरावेच लागेल हा एकाच राग ते आलापतांना दिसत आहे. भरमसाठ वीजबिलांचे तीन टप्पे पाडून देण्याची ते भाषा करत असून रोजमजुरीने तुटलेला मजूरवर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. आवाक्याबाहेरच्या विबिलांचा एक टप्पाही भरण्याकरिता पैशाचे नियोजन नसल्याने कुणी कर्ज घेतांना दिसत आहे तर कुणी घरातील दागिने मोडून वीजबिल भरण्याकरिता पैशाची जुळवणूक करीत आहे. तर पैशाच्या जुळवणुकीचे कोणतेच पर्याय नसलेल्या व्यक्ती,आता काय शरीराचे अवयव विकून वीजबिल भरावे काय, ही आगतिक्ता व्यक्त करीत आहे. लॉकडाऊन काळात रोजगारांपासून वंचित राहिल्याने पदरी बांधलेला पैसाही घरखर्चात वळता झाल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या सामान्य जनतेला शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना अवाढव्य वीजबिलांची खैरात मिळाल्याने सामान्य जनता पुरतीच हादरून गेली आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल कपात होईल या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे जनता टक लावून बसली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर २२ मार्च पासून देशात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले. जीवनावश्यक दुकानांच्या व्यतरिक्त संपूर्ण व्यावसायिक बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सोशल डिस्टनसिंगच्या कारणास्तव उद्योग, कारखाने व कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या. पाच लोकांपेक्षा जास्त लोकं एकत्र येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे रोजमजुरी व रोजगार पूर्णतः हिरावल्या गेले. छोटेमोठे व्यवसाय बंद पडले. खाजगी नोकऱ्यांवरून लोकांना काढण्यात आले. परंपरागत व्यवसाय बंद पडले. हंगामी व्यवसायाची तर पूर्णतः वाट लागली. लॉकडाऊन वाढत गेल्याने हंगामी व्यवसायाचा हंगामच निघून गेल्याने व्यासायिकांचे चांगलेच आर्थिक नुकसान झाले तर काही व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले. लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पडण्यावर पूर्णतः निर्बंध लादले गेंल्याने जनता चार भिंतीत कैद झाली. रोजमजुरी, रोजगार व नोकऱ्या हिरावल्याने कौटुंबिक उदरनिर्वाहाचे प्रश्न पडले असतांनाच अवाढव्य रकमेची वीजबिले माथी मारण्यात आल्याने नागरिक चांगलेच बुचकाळ्यात पडले आहेत. ज्यांनी ऑनलाईन वीजबिले भरली ते ही एकत्रित आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून चक्रावले आहेत. जून महिन्यात अंदाजान वीजबिल देण्यात आले ते ही पाच ते सात हजारांच्या वरूनच आले तर जुलै महिन्यात रिडींग नुसार वीजबिले देण्यात आली ती ही १० हजारांच्या वरूनच आली. मार्च ते जून महिन्यापर्यंतची वीजबिले २० हजारांच्या घरात आली. लॉकडाऊन मधील वीजबिले व अन्य करांमध्ये सूट देण्याऐवजी आवाजवी वीजबिले देऊन नागरिकांची लूट करण्यात येत असल्याची भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली असून याकडे लोकप्रतिनिधी तसेच राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल कपात करून सामान्य नागरिकांवरील आर्थिक बर्डन कमी करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.