लॉकडाऊन काळात व्यवसायांवर लावलेले निर्बंध हटविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले. २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत असल्याने नागरिकांची आर्थिक गळचेपी झाली असून नागरिकांवर मानसिक तणावही निर्माण झाला आहे. या काळात रोजगार नोकऱ्या हिरवाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नागरिकांनी आत्महत्ये सारखे पर्याय निवडले आहे. छोटे व्यवसाय ठप्प पडले आहेत. हंगामी व्यावसायिकांचा हंगाम लॉकडाऊनला बळी चढला आहे. बारा बलुतेदारांचे व्यवसायही लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत. परंपरागत व्यवसायालाही लॉकडाऊनची झळ बसली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची तर पूर्ती दैना झाली आहे. वाहतुकीची साधने बंद असल्याने गावागावात नागरिक कैद झाले आहेत. शहरांपासून तर गाव खेड्यापर्यंत माणसांना सुखरूप पोहचवणारी वाहतूक वर्धनी लालपरी लॉकडाऊन काळापासून पूर्णतः बंद होती, तर आता तिच्या वाहतुकीवरही सीमा लावण्यात आल्या आहे. त्यामुळे वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढवले आहे. सरकारी सेवेत असूनही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी मिळत नसून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने बहुतांश एसटी ड्राइवर ट्रांसपोर्टींग कंपन्यांमध्ये ट्रक चालवितांना दिसत आहे. एकूणच लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीचा आलेख वाढला असून राज्यात बेरोजगारीची छाया गडद होतांना दिसत आहे. तेंव्हा लॉकडाऊन शिथिल करून प्रत्येक व्यसायावरील निर्बंध हटवून व्यवसाय सुरु करण्याची मुभा देण्याबरोबरच एसटी बसेसही पूर्ववत सुरु करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखेतर्फे उपविभागीय अधिककाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात छोटेमोठे व्यवसाय ठप्प पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य वर्गाला आणखीनच भरडण्याचे काम सुरु असून शासनाच्या या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखेतर्फे डॉ. आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या काही मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एसटी बस सेवा पूर्ववत सुरु करावी, बारा बलुतेदार व निर्बंध घातलेले सर्वच व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, वाजनतंत्री व बॅण्डबाजावरील बंदी हटविण्यात यावी, हॉटेल रेस्टॉरंट व चाय पानटपऱ्या सुरु करण्याची परवानगी देऊन कामगारांना त्याठिकाणी काम करण्याची मुभा देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य करून जनतेच्या रोजगारा विषयक समस्यांचे समाधान करण्याचे शासनाने प्रयत्न करावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखे तर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.