तालुक्यातील आणखी पाच रुग्ण कोरोनातून बरे, सक्रिय रुग्णांची संख्या झाली आहे १० !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असल्याचे वाटत असतांनाच ११ ऑगष्टला ६ व १३ ऑगष्टला ८ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोना परत एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. आणखी ५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १० झाली आहे.
परतीच्या वाटेवर असलेला कोरोना परत एकदा सक्रिय झाल्याने प्रशासनावरील ताण वाढला असून नागरिकांमधील भीतीही वाढली आहे. ११ व १३ ऑगष्ट या दोन दिवसांत तब्बल १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणवू लागले. परंतु रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढतीवर असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. कोविड केयर सेंटरमध्ये भरती असलेले रुग्ण झटपट बरे होत असल्याने याठिकाणी रूग्णांवर होत असलेल्या उपचाराला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज एकूण ३५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. तर ११८ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्याचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ५७२ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून ७८७ व्यक्तींची स्वाब तपासणी करण्यात आली आहे. जवळपास १३५९ लोकांची आरटी, पिसिआर आणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे. शहर व तालुक्यातील कंटेनमेन्ट झोन वाढून ९ झाले आहे. यापैकी ३ शहरात तर ६ ग्रामीण भागात ऍक्टिव्ह आहेत. कोविड केयर सेंटरला एकूण ३७ व्यक्ती भरती आहेत. तालुक्यात एकूण ५५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद असून त्यापैकी ४३ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर २ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण १० राहिले आहेत. त्यातील ९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती आहेत तर एका रुग्णावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. प्रशासन शहर व तालुक्यातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांवर बारीक लक्ष ठेऊन आहे. प्रतिबंधित क्षेत्रात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत नागरिकांची तपासणी मोहीमही सुरु आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.