नगर परिषद कर्मचारी संघटनांनी केले एक दिवसीय कामबंद आंदोलन !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वणी शाखे तर्फे आपल्या विविध मागण्यांसंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्फत ८ जुलैला मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची दखल न घेतल्या गेल्याने कर्मचारी संघटनेने ३१ जुलैला मुख्याधिकाऱ्यांना लिखित सूचना देऊन १७ ऑगस्टला एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार आज १७ ऑगस्टला न.प. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन केलेल्या या आंदोलनात नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिती इत्यादी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे संपूर्ण वेतन कोषागारामार्फत देणे, नगर पंचायतेंमधील कार्यरत सर्व कामगारांचे समावेशन करणे, अंतिम टप्प्यातील रोजंदार कामगारांना नगर परिषदेत समाविष्ट करून घेणे, सफाई कामगारांना पदोन्नोती देणे, मोफत निवास सुविधा देणे, सार्वजनिक सुट्टीचा लाभ देणे, न.प.तील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे, सहा. संवर्गातील निवड व वेतन श्रेण्या पुर्नजिवित करणे, नगर अभियंता, उपमुख्याधिकारी यांना राजपत्रीत दर्जा देणे, अग्निशमन सेनेतील कर्मचाऱ्यांना ४८०० पे ग्रेड लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे राज्य शासन नेहमी दुर्लक्ष करीत आल्याने नाईलाजास्तव आज हे कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याचे कर्मचारी संघटनांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेत नमूद केले आहे. न.प. कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय महाकुलकर व सचिव धम्मरत्न पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या कामबंद आंदोलनात नगर परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.