WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाने केला वांदा, बैलपोळा भरणार नाही यंदा !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना संक्रमणाची गती वाढू नये याकरिता शासनाने मार्गदर्शक तत्वांची नियमावली जाहीर करतांनाच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या. शहर प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाला नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. फिझिकल डिस्टंसिंगच्या नियमांतर्गत नागरिक एकत्रित येऊन गर्दी निर्माण होणार नाही, याकरिता सभा, संमेलने, सोहळे, सामाजिक धार्मिक कार्यक्रम व विधी, महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या, जत्रा व आनंदमेळावे या सर्वांवरच निर्बंध लावण्यात आले. नागरिकांची सार्वजनिक सण उत्सवांच्या माध्यमातून शहरात गर्दी उफाळू नये याकरिता सण उत्सव घरीच साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरा करतांना नागरिकांची होणारी गर्दी संसर्ग वाढण्याला कारणीभूत ठरू नये याकरिता सण उत्सवांवर मर्यादा लादण्यात आल्या आहे. त्यामुळे १८ ऑगष्टला संपूर्ण महाराष्ट्रात भरविण्यात येणाऱ्या बैलपोळा या पारंपारिक सणावर कोरोनामुळे विरजण आले असून यावर्षी जिल्ह्यात कोठेही बैलपोळा सार्वजनिक ठिकाणी भरविता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गाव शहरातील पटांगणावर भरविण्यात येणाऱ्या बैलपोळ्याची परंपरा यावर्षी खंडित होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे. वर्षभर शेतकऱ्याची धुरा वाहणाऱ्या सर्जाराज्याला पोळ्यानिमित्त साजशृंगारानं सजविण्यात येत. शेतकऱ्याचे दैवत असलेल्या बैलांची यादिवशी घरोघरी पूजा केली जाते. बैलांना गोडधोड खाऊ घातल्या जातं. वर्षभर शेतकऱ्यांसाठी शेतांमध्ये राबणारी बैलं गाव शहरांमध्ये सजूनधजून डौलाने फिरतांना दिसतात. बैलपोळा बैलांचा सण असला तरी शेतकरीही शेतीच्या कामातून एकदिवसाची उसंत काढून बैलांना सजविण्यात रममाण होतो. बैलपोळ्याच्याच निमित्ताने का होईना एका दिवसाचा आनंद त्याच्या वाट्यालाही येतो. आभाळाएवढं दुखः पचवून हा बळीराजा आपल्या सर्जाराज्याच्या जोडीला गोंजारत आपल्या परिवारासह हा सन साजरा करतांना घरी गोडधोड शिजवून संकटातही कुटुंबात गोडवा निर्माण करतांना दिसतो.

वणी शहरात १० वर्षांपूर्वी तत्कालीन सर्कल इन्स्पेक्टर एस.के. नायक यांच्या पुढाकाराने याठिकाणी बैलपोळ्यातील बैलाच्या सजावटीला व उत्कृष्ट जोडीला बक्षीस देण्याची परंपरा सुरु झाली. नंतर कालांतराने बक्षीस देण्याकरिता समित्या गठित होऊन त्यांच्यामार्फत पोळा भरविण्यात येऊ लागला. पारंपरिक वारसा लाभलेला हा बैलपोळा सन यावर्षी कोरोनाच्या अवकृपेमुळे खंडित होणार असल्याने कास्तकारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे बच्चे कंपनींचाही चांगलाच हिरमोड झालेला दिसून येत आहे. पालकांसोबत पाहिल्या दिवशी बैलांचा पोळा पाहण्याची मजा व दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला कृत्रिम नंदिबैलांची सजावट करून त्याचे सादरीकरण करण्याचा आनंद यावर्षी त्यांच्यापासून हिरवाल्या जाणार आहे. पप्पा तो फुगा घ्या, बाबा ती भिंगरी घ्या या बच्चे कंपनीच्या आवाजांनी गजबजून उठणारा पोळा भरणारा तो परिसर शांत दिसणार आहे. रंगीबेरंगी फुग्यांची दुकाने, बासरी चक्रीनची दुकाने, खेळण्याच्या वस्तूंची दुकाने क्वचितच एक अर्धी पाहायला मिळतील पण त्यांच्या असण्याला रंगत देणारा बैलपोळा मात्र भरणार नसल्याने सर्वांच्याच आनंदावर विरजण पडणार आहे. शेवटी परंपरागत वारसा लाभलेला बैलपोळा यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली आल्याने बैलपोळा भरविण्याची ही परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. कोरोनामुळे सन उत्सवांवर निर्बंध आले असले तरी कोरोनाला हरविण्याकरिता सर्वांना एकजूट दाखवून या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याकरिता शासन व प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे. वर्ष बदलत राहतील, सन उत्सव पुन्हा येतील पण आरोग्य उत्तम राहील तर डोळे सन उत्सव पुन्हा पाहिल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share