तालुक्यातील नऊ व्यक्तींना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली ८१
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून मावळतीकडे आलेला कोरोना परत एकदा सक्रिय झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले कोविड योद्धेच कोरोनाग्रस्त निघत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून कोविड योध्यांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. तेलीफैलातील डॉक्टर नंतर पोलीस दल व गृहरक्षक दलातील सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह निघत असल्याने पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज आणखी ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे.आज एकूण २९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ८१ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ७९ व्यक्तींची रिपोर्ट निगेटिव्ह तर २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. आता पर्यंत ९९८ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १२२२ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली. आज पावेतो टोटल २२२० आरटी-पीसीआर व रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. ८१ रुग्णांपैकी ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २८ झाले आहेत.
शहर व तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेला कोरोना परत एकदा उफाळून आला आहे. तेलीफैल नंतर रजानगर व शास्त्रीनगर याठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत असून आता या कोरोना विषाणूने पोलिसदलात शिरकाव केला असून पोलीस दलातील तीन व गृहरक्षक दलातील एक रक्षक पॉझिटिव्ह निघाला आहे. डॉक्टर नंतर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह यायला लागल्याने प्रशासनाची चांगलीच चिंता वाढतांना दिसत आहे. एकामागून एक पोलीसदलातील पोलीसबंधू पॉझिटिव्ह आढळत असल्याने पोलीस प्रशासनही चिंतेत आलं आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये छोरीया कॉलनी येथील पोलिसाच्या कुटुंबातील ४ सदस्य, गणेशपूर येथील फ्लॅट मध्ये वास्तव्य असणारा एक पोलीस, गौरक्षण मधील एक व्यक्ती, फुकटवाडीतील एक व्यक्ती, रंगारीपुऱ्यातील अंडेविक्रेता, वसंतगंगा विहार येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज एकूण ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर वासियांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली असून प्रशासनावरील ताणही चांगलाच वाढला आहे. शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे व्यक्ती पॉझिटिव्ह निघत असल्याने उपाययोजना करतांना प्रशासन व आरोग्य विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी सुद्धा प्रशासन प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची योग्य ती दक्षता घेत असून कोरोना बाधित रुग्णांवरही योग्य उपचार केल्या जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. तालुक्यात एकूण ८१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे. कोविड केयर सेंटरला ७० व्यक्ती भरती आहेत. एकूण प्रतिबंधित क्षेत्र १४ झाले असून ५ शहरात तर ९ ग्रामीण भागात आहेत. २८ रुग्णांपैकी २७ रुग्ण कोविड सेंटरला तर एका रुग्णावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.