शहरातील आणखी आठ व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली १८२
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून प्रत्येक उजाडणारा दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढवितांना दिसत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चिंताग्रस्त झाले असून उपाययोजना करतांना प्रशासनावर चांगलाच तान पडतांना दिसत आहे. आज तालुक्यात आणखी आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या १८२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आज कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या १५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १०८ झाली आहे.
शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. आज २९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ८ पॉझिटिव्ह तर २१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज १३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्या सर्वांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत ११९३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, तर १६७० आरटी पीसीआर स्वाब तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ६२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २३३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ६४ व्यक्तींना सध्या स्थितीत कोविड केयर सेंटरला ठेवण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये रवी नगर येथील दोन, साईनागरी एक, गाडलीपुरा तीन, पटवारी कॉलनी एक, तर विठ्ठलवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८२ झाली असून १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आठ कोरोना बाधित रुग्णांवर अन्य जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही अनावश्यक जनसंपर्क टाळून कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.