WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोना संक्रमणाची गती वाढतच असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही फुगत चालला आहे. आज शहरातील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मृत्यूची नोंद झालेला तालुक्यातील हा पहिला कोरोना बळी ठरला आहे. याआधी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील व्यक्तींच्या नोंदी नागपूर व वर्धा जिल्ह्यात झालेल्या आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांना उपचारांती पूर्णपणे बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले आहे.

शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. तालुक्यात आणखी एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ८२ वर्षीय या सेवानिवृत्त शिक्षकावर यवतमाळ येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु होते. याआधी २२ जुलैला तेलीफैल येथील महिलेचा सेवाग्राम येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता तर १० ऑगस्टला मंगलम पार्क येथील २० वर्षीय तरुणाचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला होता. या दोन्ही मृत्यूच्या नोंदी जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांची जिल्ह्यात नोंद घेण्यात न आल्याने आज तालुक्यात पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली आहे. १० ऑगस्टला तालुक्यात एक ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उरला होता. मोनिनपुऱ्यातील हाणामारी प्रकरणात जामीन न मिळाल्याने जिल्हा कारागृहात असलेल्या त्या व्यक्तीला त्याठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. तालुक्यात तो एकच व्यक्ती कोरोना बाधित उरला होता. तालुका कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतांनाच अचानक दहा दिवसानंतर ११ ऑगस्टला कोरोनाचे हॉसस्पॉट ठरलेल्या तेलीफैल येथे दवाखाना असलेला डॉक्टर पॉझिटिव्ह निघाला तर घोन्सा येथील चार व्यक्ती व गणेशपूर येथील एक महिला पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाचा मुक्काम वाढला. ११ ऑगस्टला सहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७ झाली. त्यानंतर १३ ऑगस्टला रजानगर येथे विशाखापटणम येथून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर तेलीफैलातील पाच व्यक्ती आणखी पॉझिटिव्ह निघाले. तसेच चिंचोली (कोलगाव) येथील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने ग्रामीण भागात परत कोरोनाचं जाळं तयार झालं. १३ ऑगस्टला एकूण आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा ५५ वर पोहचला. १० ऑगस्टला परतीच्या वाटेवर असलेला कोरोना ११ ऑगस्ट पासून असा काही सक्रिय झाला की, शहर व तालुका अगदीच हादरून गेला. ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या २३ दिवसांत निव्वळ जिल्ह्याच्या रेकॉर्ड नुसार १४८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. ११ ऑगस्ट पासून सुरु झालेला कोरोनाचा तांडव तालुक्यात अद्यापही सुरूच आहे. या २३ दिवसाच्या कालावधीत डॉक्टर, वकील, पोलीस, शिक्षक, प्रतिष्ठित व्यावसायिक व वेकोलिचे कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाले. या २३ दिवसात कोरोनाची अशी काही लाट आली की, जिकडे तिकडे पॉझिटिव्हच पॉझिटिव्ह दिसायला लागलं. ११ ऑगस्टला तालुक्यात ४७ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होती. तर आज १८९ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे.

आज १४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी १२ निगेटिव्ह तर दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये शहरातील रंगारीपुरा येथील एक तर दुसरा मारेगाव येथील रहिवासी आहे. आज आणखी ३१ व्यक्तींचे नमुने घेऊन तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे २९१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८९ झाली असून ११९ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share