WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच, आज २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, रुग्णांचे द्विशतक पूर्ण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यात कोरोनाने अक्षरशः उच्छाद मांडला असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा तांडव सुरु असून रुग्णांचा आलेख सारखा वाढतच चालला आहे. कोरोना या साथीच्या आजाराने तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे द्विशतक पूर्ण केले असून मागील २४ दिवसांत कोरोनाने अतिशय आक्रमक पवित्रा घेत १६८ रुग्णांची अतिशीघ्र भर घातली आहे. आज आणखी २० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. आज आणखी १३ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. शहरातील बहुतांश परिसर कोरोनाच्या संक्रमण कक्षेत आला असून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राची रीघ वाढतच चालली असून आरोग्य विभागातील आरोग्य सेवक व आशा सेविकांची पायपीटही चांगलीच वाढली आहे. उजडता दिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढवत असून शहरातील निम्या पेक्षा जास्त परिसर कोरोना संक्रमणाच्या सावटात आला असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी त्यांचे प्रयत्न तोडके पडतांना दिसत आहे. एकीकडे शिवावं तर दुसरीकडे उसवत असल्याने उपाययोजना करतांना प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांची बाजारात उडणारी झुम्बड व वाढता जनसंपर्क कोरोना संक्रमणाचे प्रमुख कारण बनत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून शहरात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे.

आज एकूण ५० तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १७ पॉझिटिव्ह तर ३३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज १४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ११ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण १२३३ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या तर १७५९ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ३१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २७२ स्वाबचे अहवाल येणे बाकी आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०९ झाली असून १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३८ रुग्णांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत. तर २७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये भरती असून ११ रुग्णांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. तालुक्यात एकूण ६० प्रतिबंधित क्षेत्र सक्रिय असून शहरात ४१ तर ग्रामीण भागात १९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये गणेशपूर येथील एक, राजूर एक, चिखलगाव एक, नवीन सावंगी येथील सहा, भालर दोन, उकनी एक, लालगुडा एक, सावरकर चौक दोन, रंगनाथ नगर दोन, सेवानगर एक, रवी नगर एक तर गुरुनगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला आटोक्यात ठेवण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करीत असून नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share