राजूर (कॉ) येथील वार्ड क्रं. ३ मधील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमित बांधकाम हटविण्याची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ३ मधील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून पक्के बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांना मार्गक्रमण करतांना अडचण निर्माण होत असून रहदारीलाही अडथळे निर्माण होत असल्याने रस्त्यावरील अतिक्रमित बांधकाम हटविण्याची मागणी वार्ड क्रं. ३ मधील नागरिकांनी राजूर (कॉ) ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राजूर (कॉ) येथील वार्ड क्रं. ३ मध्ये सुधाकर भगत यांच्या घराचे बांधकाम सुरु असून त्यांच्या घराचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर आल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक अडचणी निर्माण होतांना दिसत आहे. भगत यांनी आपल्या घराचे बांधकाम स्वतःच्या हद्दीतील जागेत करण्याऐवजी सार्वजनिक रस्ता बांधकामाने वेढला आहे. सुधाकर भगत हे हेतुपुरस्सरपणे सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम करून रहदारीला अडथडे निर्माण करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या दैनंदिन वापराच्या रस्त्यावर अतिक्रमण करून अवागमनाची समस्या निर्माण केली जात आहे. सुधाकर भगत यांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याने येथील रहिवाशांना दैनंदिन कामाकरिता जाण्या येण्यास अडचणी निर्माण झाल्या असून हातगाडीवाले व फिरत्या व्यावसायिकांचा व्यवसायाचा मार्गच बंद झाला आहे. सुधाकर भगत यांची मुलगीच सरपंच असल्याने ते अरेरावीची भाषा करत असून कुणालाही न जुमानता सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून खुले आव्हान देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा मुलगाही जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांची आणखीच हिम्मत वाढल्याचे बोलल्या जात आहे. सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून ते ग्रामपंचायत प्रशासनाला खुले चॅलेंज करीत असून त्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याचे आव्हान ग्रामपंचायतेसमोर उभे ठाकले आहे. त्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता बंद होऊन नागरिकांचे अवागमन बंद झाले असून मार्गक्रमण करतांना नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. तेंव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावर आलेले त्यांचे बांधकाम हटवून रस्ता रहदारी करिता मोकळा करून देण्याची मागणी वार्ड क्रं. मधील नागरिकांनी ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर तेलंग, संजय पाटील, अजय भुसारी, नदीम शेख, असित तेलंग, हरिभाऊ अंबादे, वसंत पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.