तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरूच, गणेशपूर येथील तरुणाने घेतला गळफास !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यात मागील काही महिन्यांपासून आत्महत्यांचे सत्रच सुरु झाले आहे. तालुक्यात एकामागून एक आत्महत्यांच्या घटना घडत असून नागरिक जीवन नकोसे झाल्यागत आत्महत्यांचे मार्ग निवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे आलेली हालाखीची परिस्थिती, त्यातून आलेले नैराश्य एकीकडे आत्महत्येस कारणीभूत ठरत आहे, तर दुसरीकडे जीवनातील नैराशेतून व्यसनाधीनतेकडे वळलेले युवक नशेच्या अधीन जाऊन मृत्यूला कवटाळत आहेत. काल रात्री गणेशपूर येथील तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गणेशपूर गावातून मुकुटबन मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य चौकालगतच्या झुडपात लोखंडी पाईपला नायलॉन दोराने गळफास लावलेल्या अवस्थेत सदर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. तरुण वयात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
गणेशपूर येथे वास्तव्यास असलेल्या अंदाजे २३ वर्षे वयोगटातील रजनीकांत संतोष गेडाम या तरुणाने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर युवक ग्रामपंचायतेची कचरागाडी चालवत असल्याचे समजते. गणेशपूर गावातून मुकुटबन मार्गाकडे जाणाऱ्या मुख्य चौकातील रोडच्या बाजूला असलेल्या झुडपातील लोखंडी पाईपाला नायलॉन दोराने गळफास लावलेल्या अवस्थेत गावातील काही नागरिकांना सदर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. नैराशेच्या गर्तेतून व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन कौटोम्बिक कलहामुळे मनावर परिणाम झालेली तरुण मंडळी नशेच्या झुळकीत मृत्यूची वाट धरत आहेत. मागील काही महिन्यांपासून तालुक्यात आत्महत्यांची मालिकाच सुरु झाली असून एक दोन दिवसाआड आत्महत्येचे प्रकरण उघडकीस येत आहे. जीवन नकोसे झाल्यागत नागरिक आत्महत्यांचे मार्ग स्वीकारत आहेत. घरातील कर्त्या पुरुषांच्या अशा अकाली जाण्याने कुटुंबाचा आधारच हिरावल्या जात आहे. तरुणांची जीवनातील ही एक्झिट कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटून जात आहे. कुटुंबाची आधार असलेली तरुण पिढी लाचार होऊन आत्महत्येसारखे मार्ग निवडत असल्याने कुटुंबावर होणारा आघात शब्दात व्यक्त करण्याजोगा नाही. त्यामुळे या तरुणांमध्ये जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे.