तालुक्यातील सावर्ला येथील शेतकरी युवकाची विष प्राशन करून आत्महत्या !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील सावर्ला येथील शेतकरी युवकाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रकरण काल दुपारनंतर उघडकीस आले. प्रवीण नामदेव चोपणे वय ३२ वर्ष असे या आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी खूप वेळपर्यंत घराचे दार बंद असल्याने व सदर युवक निदर्शनास न आल्याने बैलांना पाणी पाजण्याकरिता गेलेल्या मृतकाच्या पुतण्याने घरात डोकावून पहिले असता तो निपचित पडून असल्याचे निदर्शनास आल्याने त्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रवीण चोपणे याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मृतकाचा पुतण्या मोहन मुर्लीधर चोपणे (१९) याने घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदना नंतर पार्थिव शरीर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
तालुक्यात सातत्याने आत्महत्यांचे प्रकरण उघडकीस येत असून काल तालुक्यात तीन आत्महत्यांची प्रकरणे उघडकीस आली आहे. बाबापुर येथील ३२ वर्षीय शंकर गुलाब काकडे याने विषारी द्रव्य प्रश्न करून, गणेशपूर येथील २३ वर्षीय रजनीकांत गेडाम याने गळफास घेऊन तर सावर्ला येथील ३२ वर्षीय शेतकारी युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. लॉकडाऊन काळात नैराशेने ग्रासलेल्या व्यक्तींची मानसिकता दुबळी झाल्याने ते आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यांच्या मध्ये जीवनाचा सकारत्मक दृष्टिकोन रुजविण्याची गरज असून त्यांना जगण्याचं पाठबळ देऊन योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यातील नैराश्य दूर करण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे. घरातील कर्ते पुरुष व युवा पिढी मानसिक तणावातून व गरिबीमुळे आलेल्या लाचारीला कंटाळून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कुटुंबाचा आधारवडचं तुटून पडत असल्याने संपूर्ण कुटुंब विखरतांना दिसत आहे. शासन प्रशासन व सामाजिक राजकीय पुढाऱ्यांनी आत्महत्या ग्रस्त कुटूंबांना आधार देऊन कुणीही ढासळलेल्या मानसिकतेतून आत्महत्या करणार नाही, याकरिता गाव शहरात जीवनाचं महत्व समजावून सांगणारे मार्गदर्शन शिबिरं घेण्याची नितांत आवशक्ता येऊन पडली आहे. नाही तर आत्महत्यांचे हे सत्र असेच सुरु राहील.