तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच, तालुक्यातील १८ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून कोरोना रुग्ण वाढीचा आलेख तीव्र गतीने वाढतांना दिसत आहे. आज आणखी १८ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ झाली आहे. आज आणखी आठ व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण १७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण शहरापासून तर गावखेड्यापर्यंत अगदी जलद गतीने होत असून तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होतांना दिसत असून नांदेपेरा रोडवर दवाखाना असलेले नामांकित डॉक्टर दाम्पत्य पॉझिटिव्ह निघाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती संचारली आहे. कोरोनाने डॉक्टर वर्गांकडे आपला मोर्चा वळवला असून नामांकित डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतांना दिसत आहे. डॉक्टर कोरोना बाधित होत असल्याने नागरिकांमध्ये घाबरगुंडी सुटली असून कित्येक जण छोट्या मोठ्या आजारांवर घरगुती उपचार करतांना दिसत आहे. आज ६१ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १५ पॉझिटिव्ह तर ४६ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ९ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण १३०१ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १८३८ व्यक्तींची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज १८ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २६९ झाली असून १७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४५ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ३२ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर ११ रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या स्थितीत ७६ व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आज आणखी ३१ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २५० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पद्मावती नगर येथील एक, देशमुखवाडी एक, रांगणा एक, राजूर येथील दोन, उकणी येथील चार, रंगारीपुरा पाच, नांदेपेरा रोड दोन, पंचशीलनगर एक तर वसंत गंगा नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. उकणी येथील चारही पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती ४ सप्टेंबरला पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असल्याचे समजते. देशमुखवाडी येथील रहिवासी असलेला भांडे विक्रेताही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.