तालुक्यात परप्रांतातून येणाऱ्या व्यक्तींमुळे वाढली कोरोनाची धास्ती तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडत नागरिकांचा मुक्त संचार !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असतांना नागरिक मात्र कोरोना या गंभीर स्वरूपाच्या आजाराला अगदीच सहजतेने घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक जराही या आजाराविषयी गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. शासन व प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. प्रशासनाच्या नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन होतांना दिसत नाही. नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून प्रशासनाच्या लाख उपाययोजनांतरही कोरोनावर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याचे रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून निदर्शनास येत आहे. अनलॉक झाल्यापासून जनता एवढी निर्भीड झाली आहे की, वर्दळीच्या ठिकाणी बिनधास्त वावरून कोरोनालाच आव्हान देत आहे. खबरदारीच्या नियमांना बगल देत स्वतःचे व इतरांचेही आरोग्य धोक्यात घालतांना दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर निघत कित्येक जण शहरात फेरफटका मारतांना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्या नंतर सील केलेल्या परिसरातून कुणालाही किमान १४ दिवसांपर्यंत बाहेर पडता येत नसतांनाही प्रतिबंधित क्षेत्रातील जनता नियमांना धाब्यावर बसवून बिनधास्त बाहेर पडतांना दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडणारी व्यक्ती नंतर पॉझिटिव्ह आली तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात, याची प्रचिती तेलीफैलातील महिलेच्या अंतयात्रेत सहभागी होण्यावरून आलीच आहे. अशाच प्रकारची प्रचिती उकणी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून होते की, काय ही भीती वर्तविल्या जात आहे. काल उकानी येथील पॉझिटिव्ह आलेली महिला प्रतिबंधित क्षेत्र लांघून शेतात निंदन करण्याकरिता जात असल्याचे समजते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. परप्रांतातून आलेले नागरिकही काही दिवस घरीच विश्रांती न घेता सार्वजनिक ठिकाणी वावरतांना दिसत आहे. इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन त्यांचे आरोग्यही धोक्यात आणत आहेत. काल पॉझिटिव्ह आलेले डॉक्टर महिलेचे पती परप्रांतात अंत्यसंस्काराकरिता गेले होते. त्यांना लक्षणे आढल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर दाम्पत्यांनी कोविड केयर सेंटरमध्ये जाऊन कोरोना तपासणी केली असता सहा ते सात दिवसांनी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या कालावधीत त्यांचा कित्येकांशी संपर्क आला असेल, दवाखानाही सुरूच होता. त्यांच्या संपर्कातील नागरिकही दहशतीत आले आहे. कोलार कोळसा खदानीशी संलग्न असलेल्या सद् भावना व्हाल्वो कंपनीत ३० ते ४० कर्मचारी मध्यप्रदेश मधून आले असून ते इतर कर्मचाऱ्यांमध्ये वावरत असल्याने अन्य कर्मचारीवर्ग भीतीच्या सावटात आला आहे. मध्यप्रदेशातील बेळगांव येथील सद् भावना व्हाल्वो कंपनीचे काम बंद झाल्याने तेथील कर्मचारी मोठ्या संख्येने येथे आले असून त्यांच्यामध्ये ताप व खोकल्याची लक्षणे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परप्रांतातून आल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांची कोविड केयर सेंटरमध्ये तपासणी करण्यात आली नसल्याचे समजते. प्रशासनाने या लापर्वाहीजनक कृत्याकडे लक्ष देऊन नियमांना बगल देणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रही औपचारिकताच ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक प्रशासनाची जराही भीती न बाळगता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मुक्त संचार करतांना दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडत नागरिक इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. मंदर येथील रेडिमेट ड्रेसेस मधील पॉझिटिव्ह आलेल्या युवकाचा सहकारी नियमांचे उल्लंघन करून बाहेर फिरतांना दिसत आहे, उकनी येथीलही नागरिक प्रतिबंधित क्षेत्र लांघतांना दिसत आहे. शहरातील विठ्ठलवाडी, साईनगरी, शास्त्रीनगर, छोरीया ले-आऊट, अशा बहुतांश प्रतिबंधित परिसरातील नागरिक परिसर लांघून वर्दळीच्या ठिकाणी कसलीही भीती न बाळगता वावरतांना दिसत आहे. प्रशासनाने अशा या नियमांना बगल देणाऱ्या महाभागांवर कार्यवाही करून इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. नागरिक कोरोनाला अगदी सहजतेने घेत असून प्रतिबंधित क्षेत्राला औपचारिकता समजत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडत लोकांमध्ये सहभागी होऊन कोरोनाचे संक्रमण तर वाढवतच आहे, नियमांचे उल्लंघन करून प्रशासनालाही आव्हान देत आहे.