स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे अतिरिक्त कोविड केयर सेंटर उभारणीचे काम थांबले !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील गुरुवर्य कॉलनी या ठिकाणी असलेल्या सत्यसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उभारण्यात येणारे खाजगी कोविड केयर सेंटर परिसरातील नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आल्याचे समजते. सत्यसेवा हॉस्पिटल हे लोकवस्तीत असून याठिकाणी कोविड केयर सेंटर उभारण्यात आल्यास नागरिक भीतीच्या सावटात येतील व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने याठिकाणी कोविड केयर सेंटची निर्मिती होऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना दिलेल्या निवेदनातून केली. या निवेदनाची दखल घेत सत्यसेवा हॉस्पिटल येथे खाजगी कोविड केयर सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे कळते.
शहरात कोरोनाची लाट पसरली असून कोरोना या साथीच्या आजाराची लागण होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असून शहरात एकच कोविड केयर सेंटर असल्याने त्याठिकाणी रुग्णांचा भरणा वाढला आहे. एकाच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण भरती व विलीगीकरण करण्यात येत असल्याने कोविड केंद्र ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात अतिरिक्त कोविड केयर सेंटर उभारणीकरिता कित्येक दिवसांपासून प्रयत्न सुरु असून पर्यायी ठिकाणाचा शोध घेतांना कोणताही ताळमेळ जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात याआधीही लोकवस्तीत कोविड केयर सेंटर उभारण्याला विरोध झाला होता. कोविड केयर सेंटर हे शहराबाहेर असावे ही बहुतांश नागरिकांची अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने गावाबाहेरच कोविड केयर सेंटर उभारण्याचा पर्याय शोधायला हवा ही मागणी शहरवासियांमधून करण्यात येत आहे. गुरुवर्य कॉलनी येथील सत्यसेवा हॉस्पिटल हे लोकवस्थीत असून आजूबाजूला असलेल्या निवास्थानातील नागरिकांनी या कोविड केयर सेंटरची धास्ती घेतली आहे. हॉस्पिटलच्या अवतीभवती राहत असलेल्या नागरिकांचा जाण्यायेण्याचा मार्ग हॉस्पिटल जवळूनच जात असून लहान मुलं या रस्त्यांवर खेळत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोविड केयर सेंटर उभारल्यास संसर्गाचा धोका संभवू शकतो. तसेही गुरुवर्य कॉलनीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिक आधीच दहशतीत आले आहे. त्यातल्यात्यात कोविड केयर सेंटर भर वस्तीत उभारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये आणखीच भीती निर्माण होऊन त्यांच्यात संताप व्यक्त केल्या जात आहे. तेंव्हा येथील रहिवाशांचा सत्यसेवा हॉस्पिटल येथे कोविड केयर सेंटर उभारण्याला तीव्र विरोध असून याठिकाणी कोविड केयर सेंटर उभारण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. नागरिकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही निवेदन देऊन कोविड केयर सेंटरला तीव्र विरोध दर्शविला. स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेता प्रशासनाने सत्यसेवा हॉस्पिटल येथे कोविड केयर सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतल्याचे कळते.
सत्यसेवा हॉस्पिटल येथील कोविड केयर सेंटर उभारणीचे काम स्थानिकांच्या आक्षेपामुळे थांबवावे लागल्याचे डॉ. महेंद्र लोढा यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करूनच हे काम हाती घेण्यात आले होते. कोरोना रुग्णावर योग्य वेळी योग्य उपचार व्हावे ही या कोविड केयर सेंटर उभारण्या मागची मनीषा होती. कोविड केयर सेंटर उभारण्याला दीर्घ कालावधी लागतो, सत्यसेवा हॉस्पिटल हे सर्व सेवानिशी समृद्ध असल्याने याठिकाणी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याठिकाणी सर्व उपाययोजना करूनच व नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच कोविड केयर सेंटरचे कार्य सुरु राहणार होते. शहरात ५ किमी अंतरावर एकच कोविड केयर सेंटर असल्याने कोविड रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा पुरवितांना तेथील यंत्रणेवर तान पडतांना दिसत असून त्यांच्यावरील तान कमी व्हावा व कोरोनाग्रस्तांना शीघ्र उपचार मिळावे याकरिता अतिरिक्त कोविड सेंटर उभारण्यात येत होते. डॉक्टरही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार होते. पण गैरसमजुतीतून या कोविड केयर सेंटरला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याने कोविड सेंटर उभारणीचे काम थांबवावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.