तपासणी अहवाल मिळण्यास होतो आहे बराच वेळ, मग सांगा कसा संपेल कोरोनाचा खेळ !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त होण्याकरिता दीर्घ कालावधी लागत असून स्वाब घेण्यात आलेले नागरिकही परिसरात मुक्त वावरत असल्याने कोरोना संक्रमणाचे हे सुद्धा प्रमुख कारण ठरत असल्याचे बोलल्या जात आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचे व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वाब घेऊन तपासणी करिता पाठविण्यात येतात. परंतु स्वाबचे अहवाल येण्यास आठ ते नऊ दिवसांचा कालावधी लागत असल्याने संशयित व्यक्ती परिसरात व परिसराबाहेर मुक्त वावरतांना दिसत असून जनसंपर्कात येऊन इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. लक्षणे जाणवत असलेल्या व्यक्तींचेही कोरोना चाचणी अहवाल येण्यास दीर्घ कालावधी लागत असल्याने त्यांच्या संपर्कातून इतर व्यक्ती संक्रमित होतांना दिसत आहे. स्वाबचे अहवाल प्राप्त होण्याच्या कालावधीत रुग्णांची लक्षणेही नाहीशी होतात, नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येतो व त्याला सोपस्कार म्हणून कोविड केयर सेंटला हलविल्या जाते. अशी कित्येक उदाहरणे आहेत की, कोरोनाची लक्षणे धूसर झाल्यानंतर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो आहे. मग तो टागोर चौकातील छाया चित्रकार असो की, साईनगरीतील पॉझिटिव्ह रुग्णांची मुले असो, लक्षणे निवळल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आले व त्यांना सोपस्कार पार पाडण्याकरिता कोविड केयर सेंटर मध्ये हलविण्यात आले. आज विठ्ठलवाडी परिसरातील १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. पीठ गिरणी व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण, मग एका दोघावरच कसं भागन, या व्यासायिकाच्या गाढ्या संपर्काने तब्बल त्याला पकडून १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वाब घेऊन सात ते आठ दिवसांचा कालावधी झाला. पण रिपोर्ट आज प्राप्त झाले. पीठ गिरणी व्यावसायिकाच्या कुटुंबातील एक सदस्य काही दिवस तापाने फणफणत होता. आता तर त्याची लक्षणेही निवळली आहेत. आज त्याच्या कुटुंबातील सर्वच सदस्य पॉझिटिव्ह आले. या कालावधीत सदस्य प्रतिबंधित क्षेत्राबाहेर फिरले, समाजात वावरले, त्यामुळे इतर रहिवाशांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनाचे विलंबनाने येणारे अहवाल संक्रमणाची गती वाढवत असल्याचे खुले बोलल्या जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या पीठ गिरणी व्यावसायिकाच्या कुटुंबातील सदस्यांमुळे विठ्ठलवाडी येथे आता पर्यंत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना संशयित व्यक्तीचा स्वाब घेतल्या नंतर तातडीने त्याला विलीगीकरणात ठेवणे आवश्यक असते. मात्र ८ ते ९ दिवसांपर्यंत अहवालच मिळत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पूर्णवेळ घरी किंवा घराबाहेर वावरत असते. अशा स्थितीत त्या व्यक्ती कडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती ८ ते ९ दिवसांनंतर माहित होत असल्याने दरम्यानच्या कालावधीत ती व्यक्ती कोरोना संक्रमणाचे कारण ठरत आहे. अशा पद्धतीने कामकाज सुरु राहिल्यास दहा जणांपैकी चार जण कोरोनाच्या विळख्यात येतील, असे तज्ज्ञानकडुन सांगण्यात येत आहे. तपासणी अहवाल तातडीने मिळावे यासाठी कोणत्याच सूचना अथवा निर्देश देण्यात आलेले नाहीत. आरोग्य सेवक, आशा सेविका व गावपातळीवरच्या कोरोना नियंत्रण समित्या अस्वस्थ झाल्या आहेत. नऊ दिवसांनंतर एखाद्याकडे पॉझिटिव्ह अहवाल घेऊन गेल्यास तणाव निर्माण होत असून आरोग्य सेवकांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा कोरोना लॅबची तपासणी क्षमता २४ तासांत २५० नमुने तपासण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र दिवसाला हजाराच्याही वर नमुने तपासणी करिता जातात. अहोरात्र काम करूनही प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढतच जात असल्याचे समजते. सध्यस्थितीत साडेतीन हजारांच्यावर नमुने प्रयोग शाळेत प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितल्या जात आहे.