सर्व पक्षीय सभेत एकमत न झाल्याने जनता कर्फ्यू न पाळण्याचा निर्णय !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातांना दिसत असून तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. तालुक्यात कोरोनाची पकड मजबूत झाली असून कोरोनावर आळा घालण्याचे सर्वच उपाय निष्फळ ठरत आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना यश मिळत नसून आरोग्य प्रशासनही हवालदिल झाले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आल्याने शहरातही जनता कर्फ्यू पाळण्या संदर्भात चर्चा करण्याकरिता सर्व पक्षीय सभा घेण्यात आली. आंबेडकर चौकातील माता मंदिरालगत असलेल्या कल्याण सभागृहात आयोजित या सभेला व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय प्रतिनिधी तसेच सुज्ञ नागरिक उपस्थित होते. याठिकाणी झालेल्या वादळी चर्चेनंतर जनता कर्फ्यू न पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यू पाळण्याने परिस्थिती पूर्व पदावर येणार नसल्याचे सर्वच उपस्थितांचे मत झाले. आता आवश्यकता आहे शासन व प्रशासनाच्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची. योग्य उपचाराची, आणखी एक कोविड केयर सेंटर उभारण्याची. कोविड केयर सेंटर उभारण्याकरिता बंद पाळणार असाल तर आजच आमचा पाठिंबा असल्याचे काही राजकीय पुढाऱ्यांचे मत होते, तर प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय बंद यशस्वी होणार नाही हे काहींचे मत झाले. संपूर्ण राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असून बसेस सुरूच राहणार असल्याने कुठल्याही व्यक्तीला शहरात येण्यापासून रोखता येणार नाही, तसेच शासकीय व प्रशासकीय कार्यालये सुरु राहतील, त्यांचे कामकाज सुरु राहील, बँका सुरु राहतील, तेंव्हा लोकांचे रस्त्यांवरून जाणे येणे सुरूच राहणार आहे. त्यामुळे बंद पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होईल असे वाटत नसल्याचे सर्वच राजकीय प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींचे मत झाल्याने अखेर बंद न पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षांनी कोरोनाची परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवतांनाच कोविड केयर सेंटर मधील असुविधांचा पाढाच वाचला. कोविड केयर सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड होत असून त्यांना प्राथमिक सुविधा व उपचार मिळत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. लोकवस्तीत कोविड केंद्र उभारण्याला विरोध होणारच असून प्रशासनाने आज पर्यंत योग्य पर्यायी ठिकाण कोविड केंद्र उभारणी करिता निवडले नसल्याचे तारेंद्र बोर्डे यांनी यावेळी सांगितले. बहुजन समाज पार्टीचे प्रवीण खानझोडे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईनेच कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे सांगतानाच बंद मध्ये प्रशासनाला सोबत घेणे आवश्यक असल्याचे सूतोवाच केले. तर राकेश खुराणा यांनी कोविड केयर सेंटर उभारण्याकरिता जर बंद पाळावा लागत असेल तर माझा उभारणी पर्यंत बंदला पाठिंबा राहील असे जाहीर केले. त्याच प्रमाणे मनसेचे राजू उंबरकर यांनी व्यापारी जो निर्णय घेतील त्याला आपले समर्थन असेल असे सांगितले. शेवटी आमदारांनी बंदने काहीही साध्य होणार नसल्याचे सांगत सावधानी बाळगून दैनंदिन कामे सुरु ठेवण्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना खबरदारीचे नियम पाळावे. स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. जेमतेम व्यवसाय व कामधंदे सुरु झाले. बंदने आणखी त्यावर परिणाम होऊ शकतो, असे बोदकुरवार यांनी स्पष्ट करतांनाच बंद न पाळण्यावर शिक्का मोर्तब झाले.
याआधी अशाच सर्व पक्षीय सभेत २९ जून पासून जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले होते. मात्र एका दिवसांतच जनता कर्फ्यू मागे घ्यावा लागला. उस्फुर्त प्रतिसाद मिळूनही जनता कर्फ्यू रद्द करण्याची वेळ आली. २९ जूनला जेंव्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले तेंव्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ होती. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू एकाच दिवसांत गुंडाळल्यानंतर ४ जुलैला पेट्रोलपंप व्यावसायिक पॉझिटिव्ह आला व ५ जुलैला त्याची पत्नी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच गेली व एक दोन करता करता ३० जुलैला एकदम १० व्यक्ती पॉझिटिव्ह आले. २९ जूनला ७ वर असणारा रुग्णांचा आकडा ३० जुलैला ३६ वर पोहचला. त्यानंतर कोरोनाशी नागरिकांचा ३६ चा आकडा झाला. व आज रुग्णांची संख्या ४१८ वर पोहचली आहे. जेंव्हा बंदची आवश्यकता होती तेंव्हा राजकारण आडवे आले, आता तर कोरोनाची मुळे घट्ट झाली आहे. आता सभागृहाबाहेर राजकारण सोडले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. तेंव्हा आता कोरोनाशी दोन हात करूनच कोरोनाला हरवावें लागणार आहे. त्यामुळे आता बंद करण्याची नाही तर नियमांचे पालन करून कोरोनाशी द्वंद करण्याची वेळ आल्याचा सूर सर्वपक्षीय सभेतून ऐकायला मिळाला.