जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, पोलीस अधीक्षक पदी रुजू होणार डी.के. पाटील भुजबळ !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
राज्य पोलीस दलातील ६० हुन अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गुरुवारी रात्री उशिरा आदेश निघाले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील व महानगरातील उंच पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा जिल्ह्यातील सेवेचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ हे यवतमाळचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहे. एम. राजकुमार यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील अवैध धंदे, टोळी युद्ध व खुना सारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याची वचक निर्माण केली होती. डी. के. पाटील भुजबळ यांच्या समोरही अवैध धंदे व गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
त्याच प्रमाणे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे रुजू होणार आहे. अहेरी, गडचिरोली विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांना बढती मिळाली असून त्यांची बदली रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. गुरुवारी रात्री पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाले असून आज अध्यादेश जरी करण्यात आला आहे.