WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुका ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही वणी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी ही महत्वपूर्ण बाब गुलदस्त्यात ठेऊन वनीकर जनतेचा विश्वासघात केला असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्णयाकडे डोळेझाक केल्याचा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत केला आहे. २०१३ मध्ये शहरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा बहाल करण्यात आला. २०१४ पासून संजीवरेड्डी बोदकुरवार हे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. तत्कालीन शासन निर्णयाची अंमलबजावणी करून उपजिल्हा रुग्णालयाला प्राधान्य दिले असते तर आज शहरातील आरोग्यविषयक समस्या निकाली लागल्या असत्या. रुग्णांना शहरातच अत्यावश्यक उपचार मिळाले असते. त्यांना गंभीर उपचाराकरिता चंद्रपूर, यवतमाळ येथे रेफर करण्याची आवश्यक्ता भासली नसती. रुग्णांना वेळेत उपचार मिळाले असते, उपचारा अभावी कुणालाही प्राण गमवावे लागले नसते. आता पर्यंत याठिकाणी दुसरे शासकीय कोविड सेंटर तयार झाले असते. पण आमदारांच्या दुर्लक्षित पणामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात परिवर्तित न झाल्याने शहर व तालुक्यात आजही आरोग्य विषयक समस्या कायम राहिल्या आहेत.

मनसेने ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून सतत पाठ पुरावा केल्याचे सांगतानाच उंबरकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ रोजी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याचे सांगितले. तत्कालीन मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या माध्यमातून सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय २०१३ मध्ये निर्गमित केला. परंतु विद्यमान आमदारांनी हे महत्वपूर्ण प्रकरण दडपल्याचे मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले आहे.

२०१४ पासून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहे. शासन निर्णय काय आहे, त्याची व्याप्ती किती याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शहरातील कोरोनाचं संकट गडद झालं आहे, शहरात एकच कोविड केंद्र आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी एक कोविड केंद्र निर्माण व्हायला हवं होतं, एकाच कोविड केंद्रात रुग्णांचा भरणा वाढल्याने त्याठिकाणी योग्य सोयी सुविधा उपलब्ध होतांना दिसत नाही. कोरोना रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने निष्पाप जीवांचा बळी जात आहे. या गंभीर बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालय आहेत, या तीनही रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर आहे. तेंव्हा ग्रामीण रुग्णालयाला त्वरित उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन याठिकाणी आणखी एक शासकीय कोविड केयर सेंटर सुरु करावे, अन्यथा मनसे जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडेल अशी सूचना वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share