WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर लागतो जाम, वाहतूक पोलीस टिळक चौकातूनच ठेवतात शहरातील वाहतुकीवर नियंत्रण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नियमांची बंधने पाळून व निर्णायक वेळेतच बाजार भ्रमणाची सक्ती असल्याने रस्त्यांवर वर्दळ कमी असायची. त्याकरिता लॉकडाऊन काळात एकेरी मार्गाने होणारी वाहतूक बंद करण्यात आली. परंतु आता शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल करत जवळपास सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने व परंपरागत व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिल्याने शहरात वर्दळ वाढली असून प्रमुख चौकांमध्ये अनियंत्रित वाहतुकीमुळे वेळोवेळी जाम लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. टिळक चौका व्यतेरिक्त अन्य कोणत्याही प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थिती दिसत नसल्याने शहरात अंतर्गत वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षिततेमुळे वाहतुकीची समस्या आणखीच बिकट होतांना दिसत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु ठेवण्याला अनुमती देण्यात आली, तसेच दुकाने खुली ठेवण्यावर वेळेच्या मर्यादा असल्याने शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी असायची. त्यातल्यात्यात कोरोना संसर्गाची भीती दरम्यानच्या काळात चांगलीच नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने ते स्वतःच घराबाहेर पडणे टाळत असल्याने शहरातील रस्ते ओस दिसायचे. आता बाजारपेठ सताड खुली झाली आहे. नागरिकांची खरेदी करिता बाजारात वर्दळही चांगलीच वाढली आहे. शहरातील प्रमुख चौकात नागरिकांची गर्दी ओसंडून वाहात आहे, त्यातच अनियंत्रित वाहतुकीने रस्ते जाम होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकेरी मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होत असून वाहतूक पोलीसांची प्रमुख चौकात उपस्थिती रहात नसल्याने अनियंत्रित वाहतुकीमुळे प्रमुख चौकांमध्ये नेहमी जाम लागतांना दिसत आहे. वाहतूक पोलिसांचा ताफा टिळक चौकाची शोभा वाढवतांना दिसत असून शहरातील अन्य प्रमुख चौकांमध्ये त्यांना वाहतूक नियंत्रणाची आवश्यक्ता वाटत नसल्याचे एकूणच चित्र पाहायला मिळत आहे. शासनाच्या पुनःश्च हरिओम अंतर्गत चित्रपट गृहे व शाळा कॉलेजेस सोडले तर संपूर्ण बाजारपेठ खुली झाली आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख मार्ग व चौकात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत असून एकेरी मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होत असून अनियंत्रित वाहतुकीमुळे नेहमी जाम लागत असल्याने पादचारी महिला पुरुषांना रस्त्यांवरून मार्ग काढतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरून आडवे तिडवे वाहन चालविणे, नको त्या ठिकाणी वाहन टाकणे, वाहन पास होण्याची जागा नसतांनाही वाहन घुसविणे, यामुळे जाम सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून काही वाहन चालक अगदीच लापर्वाहीने वाहन चालवत असल्याने पादचाऱ्यांमध्ये खास करून महिलांमध्ये धास्ती भरली आहे.

बाजारपेठेचे हृदयस्थळ असलेल्या गांधी चौक व कापड मार्केट लाईन असलेल्या प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर नेहमी वर्दळ रहात असल्याने याठिकाणी नेहमीच जाम लागतांना दिसतात. मोडक्या कमानी जवळ अनियंत्रित रहदारीमुळे वाहतुकीची कोंडी होत असून याठिकाणी नेहमी वाहतूक खोळंबलेली असते. वाहन चालकांच्या लापर्वाहीने वाहन चालविण्यामुळे महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. आधी चौका चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात असल्याने बेशिस्त वाहतुकीवर लगाम असायची, तसेच वाहन चालकांवर वचक असायची, पण आता वाहतूक पोलिसांचेच वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहन चालकही मस्त महिवाल झाले आहेत. वर्दळीच्या ठिकाणावरून सुसाट वाहन चालविणे, महिलांजवळून अतिवेगाने वाहन चालविणे त्यांचे नित्याचेच झाले आहे.

खाती चौक ते पहिल्या मोडक्या कमानी पर्यंतच्या नव्यानेच रुंदीकरण करण्यात आलेल्या सिमेंट रोड लगत वाहने उभी करण्यात येत असल्याने व रस्त्यावर दुकानातील साहित्य ठेवण्यात येत असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला हातगाडी दुकाने लावली जात असल्याने सिमेंट रोड अगदीच अरुंद झाला असून त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन रस्त्यावर वेळोवेळी जाम लागतांना दिसतो. श्रीराम मंदिरापासून तर मोडक्या कमानी पर्यंत प्रत्येक दुकानांसमोर अगदी रस्त्यावर येईल अशा प्रकारे आडवी तिडवी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकला अडथळे निर्माण होत असून याठिकाणी नेहमी जाम लागत असतो. त्याचप्रमाणे आंबेडकर चौक, सानेगुरुजी चौक महाराष्ट्र बँक, टागोर चौक, स्टेट बँक सर्वोदय चौक, दीपक चौपाटी याठिकाणी अनियंत्रित वाहतुकीमुळे नेहमी जाम सदृश्य स्थिती पाहायला मिळते. असे असतांना वाहतूक पोलीस टिळक चौकातच उपस्थिती दर्शवून तेथूनच संपूर्ण शहरातील वाहतुकीची परिस्थिती हाताळतांना दिसतात. वाहतूक पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन संविधान चौक, लालपुलिया, वरोरा घुग्गुस वळण रास्ता, ब्राह्मणी फाटा, लालगुडा चौक याठिकाणी गस्त घालतांना दिसते. शहराबाहेरील वाहतुकीवर नियंत्रण ठेऊन वाहन चालकांना शिस्त लावतांनाच शहरातील अंतर्गत वाहतूकही नियंत्रित करून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावणेही गरजेचे झाले आहे. शहरातील वाहतुकीची परिस्थिती गंभीर झाली असून वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share