शहरात अतिरिक्त कोविड सेंटर निर्माणाचे भिजत घोंगडे, माजी आमदारांनी दर्शविला खाजगी कोविड हॉस्पिटलला पाठिंबा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पळसोनी येथील शासकीय कोविड केयर सेंटरमध्ये रुग्णांचा भरणा वाढत असून त्यांना योग्य त्या सोयी सुविधा मिळत नसल्याची ओरड होतांना दिसते. त्यामुळे शहरात आणखी एक अतिरिक्त कोविड केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. कोविड केंद्र उभारण्याकरिता पर्यायी ठिकाण निवडण्याचे ताळमेळ जुळत नसल्याने व लोकवस्तीत कोविड केंद्र उभारणीस नागरिकांचा विरोध होत असल्याने कोविड केंद्र निर्माणाचे भिजत घोंगडे असतांना जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड खाजगी कोविड हॉस्पिटल सुरु करण्याला अनुमती दिली असून लोढा हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सुरु होणार असल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नागराध्यक्षांकडे तक्रार करतांनाच नागराध्यक्षाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांना लोढा हॉस्पीटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सुरु न करण्याबाबत निवेदन देऊन आपला विरोध दर्शविला. याआधी सत्यसेवा हॉस्पीटल येथे कोविड हॉस्पीटल सुरु करण्याला स्थानिकांनी विरोध दर्शविला होता. येथील नागरिकांनीही नगरसेवकांच्या माध्यमातुन सत्यसेवा हॉस्पीटलमध्ये कोविड सेंटर सुरु न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्याच प्रमाणे शहरातील एका परिसरातही कोविड केंद्र उभारण्याला तीव्र विरोध झाला होता. स्थानिकांचा विरोध व राजकीय प्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव, यामुळे दुसरे कोविड केयर सेंटर सुरु करण्याचा अद्यापही योग जुळून आलेला नाही. राजकीय नेतेही आता आरोग्य सुविधांच्या मुद्यांना हात घालतांना दिसत असून एका राजकीय नेत्याने २०१३ मध्ये ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याचे सांगतांनाच त्वरित कोविड सेंटर सुरू करण्याचा इशारा दिला, तर माजी आमदार राहिलेल्या एका नेत्यांनी लोढा हॉस्पिटल येथेच डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सुरु करण्यावर भर देत या कोविड हॉस्पिटलला पक्षातर्फे संरक्षण देण्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शहरामध्ये सुसज्ज कोविड हॉस्पिटल निर्मानाचे वेध शहरवासीयांना लागले आहे. लोढा हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पीटलचे निर्माण झाल्यास रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळतील व बाहेर ठिकाणी उपचार घेण्याकरिता रुग्णांची धावपळ होणार नाही.
शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असतांना याठिकाणी एकच कोविड केंद्र असल्याने रुग्णांना असुविधा होत असल्याची ओरड होतांना दिसते. एकाच कोविड केंद्रावर रुग्णांची तपासणी, उपचार व विलीगीकरणाचा भार देण्यात आल्याने आरोग्य प्रशासनावरही तान पडत असल्याने रुग्णांची काळजी वाहतांना आरोग्य सेवकांची तारांबळ उडतांना दिसते. तसेच याठिकाणी रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड केंद्रात दाटीवाटीने राहावे लागत असल्याची ओरड होते, तर स्वच्छता व इतर सोयी सुविधांनाही प्राथमिकता दिल्या जात नसल्याचे बोलल्या जाते. पिण्याच्या पाण्यापासून तर जेवणा पर्यंत व स्वच्छतेपासून तर उपचारांपर्यंत प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. नेहमी कोविड केंद्राबाबत प्रशासनाला धारेवर धरले जाते. त्यामुळे लोढा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल निर्माण झाल्यास शासकीय कोविड केंद्रावरील तान कमी होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सर्व सोयी सुविधांनिशी सुसज्ज असे खाजगी कोविड हॉस्पिटल मिळाल्याने त्यांची कोरोना विषयीची धास्ती कमी होऊन ते उपचार घेण्यासाठी पुढे येतील. नागरिकांनी कोरोनाची अशी काही धास्ती घेतली आहे की, अन्य आजारांकरिताही रुग्णालयात जाण्यास ते कचरत आहे. साधा सर्दी ताप खोकला झाल्यास किंवा अन्य साथीचा कोणताही आजार झाल्यास कोरोनाची चाचणी करावी लागेल व पॉझिटिव्ह निघाल्यास कोविड केयर सेंटरमध्ये राहावे लागेल या भीतीने लोकं दवाखान्यात जाण्यास भीत आहे. काही व्यक्ती ओळखीतल्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत तर काही घरगुती उपचार करून घरीच थांबत आहे. तेंव्हा नेत्यांनी आपसी समन्वय साधून कोविड सेंटर निर्माणा करिता सर्वोतपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माजी आमदारांनी कोविड सेंटरला पाठिंबा दर्शवून कोविड हॉस्पिटलला संरक्षण देण्याचा विश्वास व्यक्त केल्याने नागरिकांना आता अतिरिक्त कोविड हॉस्पिटल निर्माणाचे वेध लागले आहे.