कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीवरच, आज तालुक्यात १० कोरोना बाधित रुग्ण आढळले !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून आज १० व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५५२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ९९ झाली आहे. आज आणखी १९ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ४३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने उच्छाद मांडला असून कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने प्रशासन चिंतेत आले आहे तर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आज ३६ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर २९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ९ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ३ पॉझिटिव्ह तर ६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण १६४१ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे तर २२३३ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ३६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ७८ अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५२ झाली असून ४३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी २० रुग्णांवर कोविड केयर सेंटरला उपचार सुरु असून ६० व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये विठ्ठलवाडी येथील तीन, चिखलगाव एक, छोरीया ले-आऊट गणेशपूर एक, नायगाव एक, शिंदोला एक, रंगारीपुरा एक, जनता शाळे जवळील एक तर मेघदूत कॉलनी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथील रुग्ण वाढतच असून याठिकाणी आता पर्यंत २३ रुग्णांची नोंद झाली आहे. १८ सप्टेंबरला पॉझिटिव्ह आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील आणखी तीन जण आज पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असतांना नागरिकांनी सतर्क राहून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना योग्य ती काळजी घेत प्रशासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.