कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची शिवसेनेची मागणी !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला असून कांदा निर्यात बंदीचा आदेश मागे घेण्या करिता वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या मार्फत थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले आहे.
कोरोनामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर कांदा निर्यात बंदीचा आदेश थोपवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. कांदा निर्यात बंद केल्याने कांद्याच्या भावात खूपच घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती दैना झालेली असतांना कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय कास्तकारांच्या जख्मेवर मीठ चोळण्यासारखा आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे फक्त दलालांनाच फायदा होणार असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याचे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे. विदेशात कांदा निर्यात केल्यास उत्तम भाव मिळन्याची शक्यता असतांना केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांना आणखीच संकटात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाला विरोध दर्शवून, पंतप्रधानांना पाठविण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, तालुका प्रमुख रवी बोढेकर, माजी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, शहर संघटक अजय नागपुरे, उपशहर प्रमुख प्रशांत बल्की, युवासेना शहर प्रमुख बंटी येरणे, अण्णाजी काकडे, शैलेंद्र ताजने आदी उपस्थित होते.