म्हशींना वाहनात कोंबून वाहतूक करणारी चार वाहने ताब्यात घेऊन पाच आरोपींना केली पोलिसांनी अटक !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील खडबडा परिसरातून नेर येथे निर्दयीपणे म्हशींना कोंबून नेत असलेल्या चार चारचाकी वाहनांवर पोलिसांनी कार्यवाही करून पाच आरोपींना अटक केली आहे. चार वाहनांमध्ये तब्बल १९ म्हशींना कोंबून वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सतीघाट ते घोन्सा रोडवरील नदीच्या पुलाजवळ सदर वाहनांना अडवून वाहनांसह आरोपींना ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली. चार चाकी वाहने, अंदाजे किंमत १८ लाख रुपये व १९ म्हशी किंमत ३ लाख ८० हजार रुपये, असा एकूण २१ लाख ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
खडबडा मोहल्ला येथून म्हशींना पिकअप वाहनांनी नेर शहरात नेत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सतीघाट घोन्सा रोडवरील नदीच्या पुलाजवळ चारही पिकअप वाहनांना अडवून त्यांची झडती घेतली असता चार वाहनांमध्ये तब्बल १९ म्हशी अगदीच निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या चारा पाण्याचीही वाहनात व्यवस्था केली नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी चारही वाहनांवर कार्यवाही करून पाच आरोपीना अटक केली व वाहने पोलीस स्टेशनला लावली. MH २९ BE २४५७, MH ३४ BG २८८४, MH ३४ M ४८८३ व MH २६ H २८४५ या वाहनांवर कार्यवाही करण्यात आली असून मारोती गंगाराम दुर्गमवार (३२), राजू मधुकर झिलपे (२३) दोन्ही रा. रंगनाथ नगर, किशोर अशोक मोरे (३०), सय्यद रोशन अली (५०), तहसीन खान तशावर खान (५०) तीनही रा. शास्त्री नगर, या पाच आरोपींना अटक करून त्यांच्यावर प्राण्यांना क्रूरपणे वागविणे प्रतिबंधक कायद्यानुसार भादंवि च्या कलम ११ (१)ग ड झ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी चार पिकअप वाहने अंदाजे किंमत १८ लाख रुपये, १९ म्हशी किंमत ३ लाख ८० हजार रुपये, असा एकूण २१ लाख ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाचे विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, इकबाल शेख, संतोष कालवेलवार, अशोक दरेकर यांनी केली आहे.