कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवरच, तालुक्यात आज आढळले १३ कोरोना बाधित रुग्ण !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच असून कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढतच चालला आहे. आज आणखी १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ झाली आहे. आज १२ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ४६१ रुग्णांनी कोरोनावर केली आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. तालुक्यात १५ कोरोना बळींची नोंद झाली असून यातील बहुतांश रुग्ण वयोवृद्ध व इतर व्याधींनी ग्रस्त होते. कोरोनाची परिस्थिती गंभीर वळण घेऊ नये याकरिता शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करतांनाच नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास कटिबद्ध केले. तरीही काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने त्यांची दुर्लक्षितता कोरोना संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. आज ५७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १३ पॉझिटिव्ह तर ४४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १० रॅपिड अँटीजेन टेस्टचे रिपोर्ट पूर्णतः निगेटिव्ह आले आहे. आज आणखी २० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यात आज १३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ५७७ झाला असून ४६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ एवढी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २१ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून १९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. तर ५७ रुग्णांना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यस्थितीत ५२ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात आहेत.
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये चिखलगांव येथील एक, कुंभारखणी दोन, भालर दोन, राजूर एक, सोमनाळा एक, आनंद नगर एक, ड्रिमलँड सिटी येथील तीन तर सावरकर चौक येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्या करिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही खबरदारीचे नियम पाळण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.