कोविड हॉस्पिटल विरोधात तेलीफैल वासियांचे आज पासून साखळी उपोषण
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
शहरातील लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याला जिल्हाप्रशासनाने अनुमती दिल्याने लवकरच याठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरु होऊन कोविड रुग्णांना उपचार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असतांनाच आज तेलीफैल प्रभाग क्रं ६ मधील नागरिकांनी या कोविड हॉस्पिटलला तीव्र विरोध दर्शवित लोढा हॉस्पिटल जवळ साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. २२ सप्टेंबरला उपविभागीय अधिकाऱ्यांना तेलीफैल येथे कोविड हॉस्पिटल सुरु न करण्याबाबत निवेदन देऊन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच २३ सप्टेंबर पासून हॉस्पिटल समोर साखळी उपोषणाला बसणार असल्याचे स्थानिकांनी निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तेलिफैलातील महिला व पुरुष लोढा हॉस्पिटल जवळ साखळी उपोषणाला बसले आहेत.
शहरात कोरोनाने थैमान घातले असून दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात दुसरे कोविड केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. कित्येक दिवसांपासून पर्यायी ठिकाणाच्या निवडीची प्रक्रिया सुरु असून समन्वयाच्या अभावामुळे कोविड सेंटर निर्माणाचा मुहूर्तच निघत नसल्याने शहरात एकाच कोविड केंद्रावर रुग्ण सेवेचा डोलारा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा तांडव सुरु आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. एकाच कोविड केयर सेंटर मध्ये रुग्णांचा भरणा होत असल्याने रुग्णांची प्रत्येक बाबतीत असुविधा होत असल्याची ओरड होत असते. तेंव्हा शहरात आणखी एक कोविड केयर सेंटर निर्माण व्हावे, ही मागणी जोर धरू लागली. शासकीय कोविड केंद्र निर्माणाचे भिजत घोंगडे असतांनाच खाजगी कोविड हॉस्पिटल निर्माणच्या हालचाली सुरु झाल्या. सत्यसेवा हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल सुरु करण्यावर शिक्का मोहर्तबही झाले. पण स्थानिकांच्या विरोधापुढे सर्वानाच नमते घ्यावे लागले व कोविड हॉस्पिटल निर्माण प्रक्रिया रद्द करावी लागली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने डीडीकेटेड कोविड हॉस्पिटल करिता लोढा हॉस्पिटलची निवड करून त्याठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरु करण्याला परवानगीही दिली. परंतु एकवेळ कोरोनाचे हॉसस्पॉट ठरलेल्या तेलीफैल परिसरातून याठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरु करण्याला कडाडून विरोध करण्यात येत असून येथील स्त्री पुरुषांनी कोविड हॉस्पिटल विरोधात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. कित्येक दिवसपर्यंत कंटेनमेंट झोन राहिलेल्या तेलिफैलातील नागरिक कोरोनाने धास्तावले असून परिसरात कोविड हॉस्पिटल झाल्यास याठिकाणी येणाऱ्या कोविड रुग्णांमुळे परिसरात आणखी कोरोनाचे संक्रमण वाढेल, या भीतीने त्यांच्या मनात घर केले आहे. तेलीफैल परिसरातून ग्रामीण रुग्णालय व दामले फैल होऊन मुकुटबन रोडवर निघणारा हा शॉर्टकट मार्ग असून या मार्गावर नेहमी वर्दळ असते. याच मार्गावर भरवस्तीत लोढा हॉस्पिटल असल्याने रोडवर खेळणाऱ्या लहान मुलांना व रोडच्या बाजूने गप्पा मारत बसणाऱ्या वृद्धांना येथे येणाऱ्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांची निवासस्थाने असलेल्या व जाण्या येण्याच्या प्रमुख मार्गावर असलेल्या लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचा निर्णय मागे घेऊन येथील कोविड हॉस्पिटलला स्थगिती देण्याच्या मागणीसह तेलीफैल प्रभाग क्रमांक ६ येथील महिला व पुरुष साखळी उपोषणाला बसले आहेत. २५ सप्टेंबर पासून लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु होणार असून माजी आमदारांनी या कोविड हॉस्पिटलला संरक्षण देण्याचा विश्वास दाखविला आहे.