वर्धा नदीवरील पाटाळा पूल बनतो आहे सुसाईड पॉईंट, या महिन्यात तीन युवकांनी केली नदीत उडी घेऊन आत्महत्या !
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या लांब अंतरित पुलाने दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडल्या आहेत. नदीच्या ह्या लगाड यवतमाळ तर नदीच्या त्या लगाड चंद्रपूर जिल्हा सुरु होतो. पुलाच्या दोन टोकावर दोन जिल्ह्यांच्या सीमा येत असल्याने हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणारा दुवा म्हणूनही ओळखल्या जातो. या पुलावर बरेच अपघात झाले असून कित्येकांना जलसमाधी मिळाली आहे. अपघात असो किंवा अन्य कोणतेही प्रकरण असो तक्रार नोंदविताना घटना नदीवरील पुलाच्या अलीकडे की पलीकडे घडली हे प्रामुख्याने पोलीस प्रशासनाकडून विचारल्या जाते. दोन जिल्ह्यांच्या सीमा वादात पुलावरील रस्त्यांचे डागडुजीकरण व पुलाचे सांदर्यीकरण नेहमीच दुर्लक्षित असते. दोन्ही जिल्ह्यातील शेकडो गाव शहरातील लोकांची तहान भागवणारी व पिके जगवणारी जीवन वाहिनी वर्धा नदी, आत्महत्या करणाऱ्यांमुळे डागिळली जात आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा जोडल्या नंतरही हद्दीची कटुता नेहमी कायम राहिली, पण दोन्ही जिल्ह्यातील व्यक्ती या नदीत जीव देतांना जीवनाची हद्द पार करीत असून सततच्या आत्महत्यांनी वर्धा नदीवरील पाटाळा पूल सुसाईड पॉईंट बनत असल्याचे एकूणच घटना क्रमांवरून दिसून येत आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्यांची मालिकाच सुरु आहे. जीवन नकोसे झाल्यागत नागरिक मृत्यूला कवटाळत आहेत. जीवनात आलेले नैराश्य, अकार्यक्षमता, न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या, मन खचीकरण, इच्छा शक्तीचा अभाव, कोणत्याही क्षेत्रात आलेले अपयश, निर्णय घेतांना येणारी उदासीनता, हळव्या मनावर होणारा शब्द प्रहार, मानसिक विकलांगता, योग्य निर्णय घेता न आल्याने किंवा निर्णय चुकल्याने वैचारिक बुद्धिमत्ता लोप पाऊण वैफल्यग्रस्त झाल्यागत नैराश्य उराशी बाळगून खचलेल्या मानसिकतेतून तरणीबांड पोरं जगण्याला मुकत आहेत. या महिन्यात जेमतेम जीवनाची लय पकडलेल्या तीन युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊन कुटुंबाला पोरके केले आहे. नव्या उमेदीचे तिन्ही युवक, एक शैक्षणिक जीवनात रममाण असणारा, एक शिक्षण पूर्ण करून वेकोलीत उच्च पदस्थ अधिकारी असलेला, तर एक आईचा एकुलता एक आधार असलेला युवक जीवनाच्या प्रवाहात टिकू न शकल्याने मरणाची वाट धरून अखेरच्या प्रवासाकडे निघाला. तीनही नव्या दमाचे युवक जगण्यात अपयशी ठरून मरणाच्या शर्यतीत उतरले. तिघांनीही वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन जीवन यात्रा संपविली. ११ सप्टेंबरला वेकोलिच्या बल्लारपूर कोळसा खाणीत सुरक्षा अधिकारी असलेला ३० वर्षीय युवक अमित विठोबा पोले रा. घुग्गुस, याने कुटुंबाशी मोबाईलवर संभाषण सुरु असतांनाच वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. १२ सप्टेंबरला त्याचा मृतदेह नायगाव बेलोरा जवळील नदीपात्रात आढळून आला. १७ सप्टेंबरला पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत असलेल्या उकनी येथील ईश्वर शंकर शुक्ला या युवकाने नदीच्या पुलावर दुचाकी उभी करून त्यावर मोबाईल ठेऊन नदीपात्रात उडी घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अद्यापही त्याचा सुगावा लागलेला नाही तर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यशही आले नाही. २६ सप्टेंबरला कुचना येथील २२ वर्षीय इंजिनियरिंग स्टुडंट अनिकेत अरुण वैद्य याने वडिला देखत वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज २७ सप्टेंबरला कोना गावा नजीक आढळून आला. या तीनही युवकांच्या आत्महत्यांनी समाजमन हेलावून गेले असून या आत्महत्यांनी शेवटी साध्य काय होतं हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला आहे. १२ सप्टेंबरला याच नदीपात्रात कोना येथील दोन चुलत बहिणी वाहत गेल्या, एक बहीण ज्योती परचाके (२०) ही ११ किमी अंतरावर बेशुद्ध अवस्थेत सापडली तर दुसरी बहीण आंचल परचाके (१९) हिच्या बद्दल अद्यापही काही माहिती मिळालेली नाही. जीवन वाहिनी असलेल्या वर्धा नदीत मृत्यूचे सत्र सुरु झाल्याने वर्धा नदीवरील पाटाळा पूल सुसाईड पॉईंट बनत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एका मागून एक झालेल्या तीन आत्महत्यांनी वर्धा नदीची छबी डागाळली असून आत्महत्या प्रवण स्थळ म्हणून पटाळा नदी नाव लौकिकास येत आहे.