खांबावरील जिवंत विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
विद्युत खांबावरील जिवंत विद्युत तार तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम रोड शास्त्रीनगर येथे घडली. शेतातून परत आल्यानंतर सतीघाट रोडवरील आपल्या घराजवळ बैलगाडी उभी करून बैलबंडीच्या मागे बांधून असलेले बैल सोडत असतांनाच जिवंत विद्युत तार तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन शेतीच्या हंगामातच दैवताचा हकनाक बळी गेल्याने शेतकऱ्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.
शेतीतील कामे आटपून बैलगाडीने घराकडे परतल्या नंतर बंडीला जुंपलेले बैल सोडत असतांनाच विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून शेतकरी घराच्या दिशेने जात नाही तोच खांबावरील जिवंत विद्युत तार तुटून बैलाच्या अंगावर पडली. यात बैलाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी चिंतामण जागोजी वाघाडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतीच्या हंगामातच बैलाचा बळी गेल्याने शेतकरी नैराशेत आला आहे. आधीच लॉकडाऊन व निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा नैसर्गिक आपत्तीमुळे बैल मेल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत आला आहे. आधीच आर्थिक संकट झेलत असलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाने आपत्ती निवारणामार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.