दूरध्वनी कंपन्यांचे उत्तम सुविधा देण्याचे दावे फोल, नेटसेवा व कव्हरेज मिळत नसल्याने नागरिक वैतागले !
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
आजच्या या तांत्रिक युगात दूरध्वनीचे माध्यम प्रगत होऊन टेलिफोन व साध्या मोबाईलच्या जागी स्मार्ट फोन हातात आले. दूरध्वनी सेवाही डिजिटल होत गेल्याने दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी ४G, ५G सिम कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून देत उत्तम सेवेची हमी दिली. इंटरनेटच्या या युगात आपल्याच कंपनीचा कव्हरेज, नेट सेवा व स्पीड किती उत्तम आहे, हे पटवून देण्याकरिता प्रत्येकच कंपनी धडपडत असते. आपल्याच कंपनीची सेवा उत्तम असल्याचा दावा प्रत्येक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी करीत असून ग्राहकांच्या डोक्यात घुसेल अशी जाहिरातबाजी करून आपल्याच कंपनीचे सिमकार्ड घेण्यास ग्राहकांना प्रोत्साहित केल्या जाते. परंतु आज घडीला प्रत्येकच दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा नागरिकांना अत्यंत वाईट अनुभव येत आहे. कोणत्याच दूरध्वनी सेवेचा योग्यरीत्या लाभ मिळत नसल्याचे एकूणच चित्र शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मग ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवेची काय अवस्था असेल! कव्हरेजच्या नावावर सगळीकडेच बोंबाबोंब सुरु आहे. नेटची स्पीड तर पाहण्याजोगीच असते. ४G स्पीडच्या डिंग्या हाकणाऱ्या दूरध्वनी कंपन्यांचे सिमकार्ड घेतल्यानंतर २G ची ही स्पीड बरोबर मिळत नाही. नेट तर नेहमीच धरपकड करत असते, कव्हरेजही बरोबर मिळत नसल्याने प्रत्येकच व्यक्ती हॅलो, हॅलो, आवाज ऐकू येते काय, आवाज कटत आहे यार, हा राग आलापतांना नेहमीच दिसत असतो. नेटची योग्य सेवा मिळत नसल्याने प्रत्येक व्यक्ती चिडून दूरध्वनी कंपन्यांवर आपला राग व्यक्त करतांनाच अपशब्दांचा प्रयोगही करतांना दिसतो. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेटवर्क व नेट सेवा मिळेल, हे दाव्यासह सांगणाऱ्या कंपन्यांचे दावे फोल ठरत असून शहरांतीलच बहुतांश भागात नेटची व कव्हरेजची मोठी समस्या निर्माण झाली असतांना ग्रामीण भागात नेट व कव्हरेजची काय अवस्था असेल, याचा अंदाज लावता येतो. प्रत्येक कंपनी सांगते की आमची सेवा धनधनाधन, लाईफ बदलणारी व कोणतेही सिम वापरा, नंतर आमचे सिम वापरा, नेटची स्पीड न मिळाल्यास पैसे वापस, पण प्रत्येक्षात दूरध्वनी कंपन्यांचे हे बिन बुडाचे दावे आता नागरिकांचा मनस्ताप वाढवू लागले आहेत. कोरोनाच्या या लॉकडाऊन काळात नेट दूरध्वनी सेवेला फार महत्व आले आहे. ऑन लाईन शिकवणी वर्गापासून तर वर्क फॉर होम पर्यंत आणी मनी ट्रान्सफर पासून व्हिडिओ कॉन्फरन्स पर्यंत सर्वच नेटच्या माध्यमातून चालत असल्याने उत्तम नेट सेवा पुरविणे आवश्यक असतांना कंपन्या याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आज प्रत्येकचं शासकीय व निमशासकीय कायालयांची कामे ऑन लाईन झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जापासून तर अर्जापर्यंतचे व नोंदणी पासून तर नुकसानी पर्यंतचे सर्वच काम ऑन लाईन पद्धतीने होत आहेत. परंतु नेटच्या समस्येमुळे प्रत्येकच कामे खोळंबतांना दिसत आहे. काही कर्मचारी कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून घराच्या छतावर बसून नेट मिळविण्याचा प्रयत्न करतात. तर विद्यार्थ्यांना उंच भागावर जाऊन किंवा झाडावर चढून ऑन लाईन क्लासेस करावे लागत आहे. दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ सेवादर वाढविले आहेत, पण सेवेचा दर्जा मात्र वाढविलेला नाही. ग्राहक प्रत्येक कंपन्यांची सेवा बदली करून थकले आहेत, प्रत्येकच कंपनीच्या सेवांचा अनुभव वैताग आणणारा आहे. उत्तम कव्हरेज व अखंडित नेट सेवेचा ढोल पिटणारी डिजिटल कंपनीचीही नेटसेवा चांगलीच ढासळली आहे. धनधनाधन वर विश्वास ठेऊन बहुसंख्य लोकांनी या कंपनीचे सिम घेतले पण त्यांना आता नेट मिळविण्यासाठी वणवण जावे लागत आहे. एकूणच दूरध्वनी कंपन्यांची सेवा कोलमडली असून सेवेचा उत्तम लाभ मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.