ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या आमसभा ऑन लाईन घेण्याची मागणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन प्रभावित झाले असून प्रत्येक जीव भीतीच्या सावटात वावरतांना दिसत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागही कोररोनाच्या विळख्यात आला असून गावपातळीवरील लोकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाने उग्र रूप धारण केल्याचे पाहायला मिळत असून प्रत्येकच क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाणही एवठ्यात वाढले असून या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्याकरिता जनसंपर्क जेवढा टाळता येईल, तेवढा टाळण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकी व सभाही ऑन लाईन पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या आढावा बैठकी वा सभा ऑन लाईन पद्धतीने घेण्यात येण्याची मागणी म. रा. ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखेच्या सचिवांनी झरीजामणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच असून या आजाराने शहरांसह ग्रामीण भागातही आपली पाळेमुळे रोवली आहेत. सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सामान्य नागरिकांसह शासकीय कर्मचारीही भीतीच्या सावटात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता शासनाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याचबरोबर अनावश्यक जनसंपर्कही टाळण्याच्या सूचना केल्या आहे. राज्यात अजूनही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यक्ता असल्याचे शासनाने मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितले आहे. त्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आम सभा सभागृहात न घेता ऑन लाईन पद्धतीने घेण्याची मागणी ग्राम सेवक संघाचे जिल्हा सचिव एल. एम. नागरगोजे यांनी केली आहे. राज्यात आता पर्यंत ८ ते १५ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कोरोनाने बळी गेले आहेत. म. रा. ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखाच्या वतीने याआधीही निवेदन देऊन या परिस्थिती बाबत अवगत करण्यात आले होते. आज १ऑक्टोबरला पंचायत समितीचे उपकार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येऊन गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या आम सभा ऑन लाईन घेण्याची मागणी म. रा. ग्रामसेवक संघ १३७० शाखेचे जिल्हा सचिव एल. एम. नागरगोजे यांनी निवेदनातून केली आहे.