वर्धा नदीत उडी घेतलेल्या उकणी येथील युवकाचा १३६ किमी अंतरावर मृतदेह आढळला
वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या उकणी येथील २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आज चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यापासून २२ किमी अंतरावर असलेल्या लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सकनूर गावाशेजारील वर्धा नदीच्या थडीवर आढळून आल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे. १७ सप्टेंबरला रात्री ७ वाजताच्या सुमारास ईश्वर शंकर शुक्ला (२३) रा. नरसुजी नगर उकणी या युवकाची वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर दुचाकी व मोबाईल आढळून आल्याने त्याने नदीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. आज १५ दिवसानंतर त्याचा मृतदेह १३६ किमी अंतरावर आढळून आल्याने त्याच्या आत्महत्या करण्याला पृष्टि मिळाली आहे.
उकणी येथील रहिवासी असलेला ईश्वर शुक्ला हा २३ वर्षीय युवक पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये टायर हेल्पर म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी तो सायंकाळी ५ वाजता पर्यंत गावातच असल्याचे समजते. रात्री ७ वाजता त्याने पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ईश्वराच्या कुटुंबियांच्या कानावर ही बातमी पडताच त्यांना धक्का तर बसलाच पण तो असे काही करू शकेल यावर त्यांचाच काय गावकऱ्यांचाही विश्वास बसत नव्हता. वडील बालपणीच वारल्यानंतर आईने घरोघरची धुनी भांडी करून त्याचे संगोपन करीत त्याला लहाण्याचे मोठे केले. त्याचे हट्ट पुविले, नुकतीच त्याने नवीन दुचाकी खरेदी केली होती. आईचा एकुलता एक सहारा असलेल्या या युवकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. एकाच महिन्यात काही दिवसांच्या अंतरातच दोन कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी आत्महत्या केल्याने उकणी हे छोटेसे गाव हादरले आहे. व्हाल्वो कंपनीत ड्रायवर असलेल्या आकाश दर्वेकर (२८) याने ७ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली तर ट्रान्सपोर्ट कंपनीत टायर हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या ईश्वर शुक्ला याने १७ सप्टेंबरला नदीत उडी घेऊन जल समाधी घेतली. लाठी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. मृतदेह घेऊन नातेवाईक गावाकडे रवाना झाले आहेत. त्याला आत्महत्या केल्याला १५ दिवस लोटले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून मृतदेहाला माती देऊन त्याचा अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.