WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

डॉक्टरांचा संप सुरु असल्याने कोरोनाच्या तपासण्या बंद

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली करिता सामूहिक कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला १७ कर्मचारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असतांनाच वणी तालुक्यातही आता या संपाचा असर जाणवू लागला असून आरोग्य सेवेवरही त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. ३० सप्टेंबर पासून तालुक्यातील कोरोनाची तपासणी बंद असून कोरोना रुग्णांबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केल्याने काँटॅक्ट ट्रेसिंग बंद असून लक्षणे असलेल्या नागरिकांचीही कोरोना चाचणी होत नसल्याने आजारग्रस्त व परिवार, परिचित व्यक्तीही भीतीच्या सावटात वावरत आहे. पालकमंत्र्यांनी या संकटाच्या काळात डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याला प्राथमिकता देत संप मागे घेण्याचे आव्हान केले आहे. तर जिल्हाधिकारीही चर्चेस तयार असल्याचे समजते. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समज दिल्याचे सांगतानाच तडकाफडकी अशी बदली करता येत नसल्याचे आंदोलन कर्त्यांना सुचविले. पण वैद्यकीय अधिकारी व पाठिंबा देणाऱ्या अन्य संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याशिवाय काम सुरु न करण्याचा पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांच्या या सामूहिक संपामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली असून नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

तालुक्यात २९ सप्टेंबर पर्यंत एकूण ६४७ पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती. तर १५ कोरोना बळींची संख्या होती. संपादरम्यान ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५७३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ वर आली आहे. आता फक्त ६ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी राहिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून १५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. कोविड केयर सेंटरमध्ये एकही रुग्ण भरती नाही. संस्थात्मक विलीगीकरणात ५ व्यक्ती आहेत.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येक जीव भीतीच्या सावटात वावरत असतांना मान अपमानाच्या भावना उफाळून आल्याने मान अपमानाचा हा विषय चांगलाच चिघळला असून सामूहिक राजिनामे देण्यापर्यंत डॉक्टर सरसावले आहेत. डॉक्टरांच्या या संपाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून हा संप एकदाचा केंव्हा निवळतो ही प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share