WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उत्तर प्रदेशातील अत्याचार प्रकरणाचा निषेध करतांनाच युवक काँग्रेसने केली नराधमांना फाशी देण्याची मागणी !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

हैवानी विकृतीला बळी पडलेल्या सामान्य कुटुंबातील दलित तरुणीला न्याय मिळावा व मानव जातीला काळिमा फासणारे अत्याचार प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारचा तसेच माणुसकीची परिसीमा लांघून दुष्क्रुत्य करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या पोलीस यंत्रणेचा निषेध नोंदविण्याकरिता तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले असून हैवानांच्या अत्याचार व मारहाणीत मृत पावलेल्या तरुणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शीक्षा देण्याची मागणीही राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच असून महिला व मुली याठिकाणी असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे उत्तर प्रदेश कुप्रसिद्ध होतांना दिसत आहे. सामान्य व दलित कुटुंबातील अल्पवयीन मुली, सुशिक्षित तरुणी व महिला राजकीय वदर्हस्तांचे अभय प्राप्त असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या हैवानांच्या अत्याचाराला बळी पडत आहे. महिलांवरील अत्याचाराचे तांडव सुरु असतांना सरकार मात्र मुकदर्शक बनून अत्याचाराला खतपाणी घालतांना दिसत आहे. सदन समाजातील व राजकीय वर्चस्व प्राप्त असणारे गिधाडं मुलींचे लचके तोडत असतांना सरकार मूग गिळून गप्प आहे. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. यूपी मध्ये दिवसाढवळ्या अपप्रवृत्तीच्या लोकांकडून होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी महिलांमध्ये थरकाप सुटला आहे. सामान्य दलित कुटुंबातील महिला व मुली दहशतीत आल्या असून मुलींचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबातही धास्ती भरली आहे. कायदा सुव्यवस्थेचा यूपीत बोजवारा झाला असून कायद्याचा जराही धाक न राहिल्याने या ठिकाणी गुंड प्रवृत्ती फोफावली आहे. पिसाट गुंडांचे टोळके राजकीय अभय मिळत असल्याने सामान्य दलित लोकांवर अनन्वित अत्याचार करीत आहेत. दलित कुटुंबातील महिला मुलींवर अत्याचार करण्याबरोबरच दलित कुटुंबाला मारहाण करणे, हत्या करणे नेहमीचेच झाले आहे. युपी शासन या सर्व घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून कायद्याच्या रक्षकांनाच कायद्याचे उल्लंघन करण्यास भाग पाडून अपप्रवृत्तीला खतपाणी घालत आहे.

महिला मुलींवरील अत्याचाराच्या युपीमध्ये अनेक घटना घडल्या व घडतच आहे. राजकीय पाठबळ लाभल्याने निर्ढावलेले काही गुंड प्रवृत्तीचे लोक दलितांवर हल्ले करून दलित महिला मुलींवर अत्याचार करून त्यांचे जीव घेत आहेत. नुकत्याच १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार व अमानवीय मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले आहे. चार नराधमांनी १९ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर अत्याचार केले. एवढेच नाही तर या मानवरूपी राक्षसांनी तिची जीभ कापून तिच्या कमरेचे हाड मोडण्या इतपत मारहाण केली. मरणासन्न अवस्थेत तिला आधी जवाहरलाल मेडिकल कॉलेज अलिगढ येथे उपचाराकरिता दखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नंतर तिला दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा २९ सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील बुलगढी तालुक्यातील वाल्मिकी समाजातील १९ वर्षीय तरुणी जातीय मानसिकतेचा बळी ठरली. युपी सरकारने तिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचार व मृत्यू प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करण्याऐवजी प्रकारनच दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कायद्याच्या रक्षकांनीही तिच्यावर अत्याचार न झाल्याचा शब्द प्रयोग करून प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर माणूसकी हरपलेल्या पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना घरातच डांबून रात्री २.३० वाजता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्यात हातभार लावला. पीडित मुलीच्या कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता गेलेले राष्ट्रीय कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही पोलिसांनी धक्का बुक्की करून जमिनीवर पाडले. चित्रपटातील गुंडागर्दीलाही लाजवेल अशा प्रकारची कोर्यसिमा पोलिसांनी पार करून शासनाकडून आपली पाठ थोपटून घेतली. पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यापासून तर कुटुंबाला धमकावण्यापर्यंत, राष्ट्रीय नेत्याची कॉलर खिचण्यापासून तर लाठीचार्ज करण्यापर्यंत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून पोलीस यंत्रणेने वाहवाही लुटली.

अशी ही दडपशाही चालविलेल्या युपी शासनाचा निषेध करतांनाच तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना माजी आमदार वामनराव कासावार, देविदास काळे, विवेक मांडवकर, मोरेश्वर पावडे, प्रमोद निकुरे, ओम ठाकूर, भास्कर गोरे, सुनील वरारकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, आशिष कुलसंगे, अशोक नागभीडकर, प्रमोद लोणारे, रफिक रंगरेज, बाबाराव चौधरी, विवेक पानघाटे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share