तालुक्यात कोरोना तपासण्या सुरु, तालुक्यातील आज चार व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !
राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मागील पाच दिवसांपासून सुरु असलेला संप पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर काही अटी शर्थींवर काल सायंकाळी मागे घेण्यात आल्याने आज कोरोनाच्या तपासण्या होऊन मिळालेल्या अहवालांमध्ये तालुक्यातील चार व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५१ झाली तर एकूण कोरोना बळींचा आकडा १७ वर पोहचला आहे. आज आणखी आठ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१ वर आली आहे.
तालुक्यात आज पाच दिवसांनंतर कोरोनाच्या चाचण्या होऊन अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यात आज चार व्यक्ती कोरोना बाधित निघाले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात कोरोना बळींची संख्या वाढतच असल्याने कोरोना या आजाराची नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनही चिंतेत आले आहे. आज चार व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून चारही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पाच व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून पाचही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १९ रिपोर्ट पेंडिंग झाल्या आहेत. आज चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६५१ झाली असून ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून १५ रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये भांदेवाडा, चिखलगांव, ब्राह्मणी व शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तर २५ सप्टेंबरला कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये देशमुखवाडी येथील ७० वर्षीय पुरुष तर गोकुलनगर येथील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.