पालेभाज्यांच्या किमतीने गाठला उच्चांक, गृहिणींचे बिघडले बजेट !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
मागील काही दिवसांपासून भाजीबाजारही महागाईच्या विळख्यात आला असून दैनंदिन आहारातील पालेभाज्यांचे भाव चांगलेच वधारले असल्याने भाजी खरेदी करताना सामान्य नागरिकांना कस लागत आहे. तसेच प्रत्येकच पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले असल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे.
भाजी बाजारातील दैनंदिन आहारातील प्रत्येकच वस्तूंच्या किमती उच्चांक गाठत असल्याने भाजी खरेदी करतांना सामान्य वर्गांवर अधिकचा भार पडत असल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडतांना दिसत आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींनी डोळ्यात पाणी आणले आहे. तर बटाटे, वांग्यांसमोर सामान्यांना नांगी टाकावी लागत आहे. मिरच्यांच्या किंमतही चांगल्याच झोम्बु लागल्या असून सांबारांच्या किमतीही आधार लागू देतांना दिसत नाही. टमाटरांच्या दरांचाही आलेख वाढत चालल्याने सामान्य नागरिक चिंतेत आला आहे. दैनंदिन आहारातील पालेभाज्यांच्या किमती आवाक्याबाहेर जात असल्याने सामान्य व्यक्ती अडचणीत आला असून त्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीरच असून नागरिक भितीतच वावरत असल्याने रोजगाराची व्याप्ती अद्यापही वाढलेली नाही. बेरोजगारीचे संकट कायमच असून कित्येक मजुरांचे हात अजूनही रितेच आहेत. कारखाने, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याने कित्येक युवक व कर्ते पुरुष नोकऱ्या गमावून बसले आहेत. अशा स्थितीत जीवन जगण्याचा संघर्ष सुरु असतांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे व दैनंदिन आहारातील वस्तूंचे भाव वधारत असल्याने सामान्य नागरिकांसमोर आर्थिक संकट निर्माण होतांना दिसत आहे. रेस्टोरंट व खानावळी अद्याप सुरु व्हायच्या असतांना पालेभाज्यांच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत तर रेस्टोरंट सुरू झाल्यानंतर पालेभाज्यांची मागणी वाढून किमती आणखीच वधारेल. परिणामवश सामान्य नागरिकांना पालेभाज्या खरेदी करणेच कठीण होऊन बसेल. आताच सामान्य नागरिकांना दैनंदिन आहारातील पालेभाज्या खरेदी करतांना कस लागत आहे. समोर पालेभाज्यांच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर सामान्य नागरिकांची वाताहत होऊन ते आर्थिक अभावामुळे दैनंदिन आहारायोग्य पालेभाज्यांची खरेदी करू शकणार नाही. परिणामतः त्यांना आरोग्य दायक जीवनसत्व न मिळाल्यास त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.