विठ्ठलवाडी परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना अटक !
परिसरात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी लावणाऱ्या नऊ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील खुल्या पटांगणात कोंबड बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी लावण्यात येत असल्याच्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कोंबड बाजारावर धाड टाकून नऊ आरोपींसह एकूण ७ लाख ३७ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील खुल्या पटांगणात कोंबड्याच्या झुंजीवर जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच गुन्हेगारी वर्तुळावर वचक निर्माण करणाऱ्या डीबी पथकाने क्षणाची विलंब न करता सापळा रचून कोंबड बाजार सुरु असलेल्या परिसराला घेराव घालून नऊ आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये अतुल पुरुषोत्तम बोबडे (३५) रा. कणकवाडी, खुशाल शरद मोहितकर (३३) रा. विठ्ठलवाडी, मंगेश वासुदेव ठेंगणे (३३) रा. विठ्ठलवाडी, राहुल रुपेश फुटाणे (३०) रा. शेगाव ता. वरोरा जी. चंद्रपूर, बंडू जयराम ढेंगडे (४८) रा. गणेशपूर, रुपेश सुरेश अंबूरकर (३०) रा. शुभम मंगल कार्यालयाजवळ वरोरा, सुभाष मोहन मोते (२९) रा. गणेशपूर, प्रवीण भास्कर पराते (३२) रा. बोर्डा ता. वरोरा जी. चंद्रपूर, संकेत भास्कर ठाकरे (२२) रा. विद्यनगरी यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम १८८, २६९, व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(ब)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी १६ नग भांडवणारे कोंबडे, पाच दुचाकी वाहने, एक मारोती अर्टिका क्रं MH ४० AR ८६७४ चार चाकी वाहन, नगदी रोकड २२ हजार १३० रुपये असा एकूण ७ लाख ३७ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील ही कोंबड बाजारावरील मोठी धाड मानल्या जात आहे. विठ्ठलवाडी सारख्या सुशिक्षित लोकांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत अशा प्रकारचा कोंबड बाजार भरवून कोंबड्यांवर पैशाचा जुगार खेळल्या जाने ही परिसराचे सौदार्ह्य गमाविण्यासारखी बाब आहे. डॉक्टर, वकील व शिक्षकांचे वास्तव्य असलेला हा परिसर शहरात सभ्य लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जातो. अशा या प्रतिष्ठित लोकांच्या वस्तीत अशी प्रकरणे घडणे परिसराच्या लौकीकास साजेशे ठरणार नाही.
सदर कार्यवाही नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सफौ प्रभाकर कांबळे, पोहवा सुदर्शन वानोळे, प्रकाश गोरलेवार, पोना सुनील कुंटावार, डीबी पथकाचे सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार, मपोका जया रोगे यांनी केली.