तालुक्यात आज कोरोनाचा एकच रुग्ण आढळला !
तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती अगदीच मंदावली असून अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्येही समाधान पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने प्रशासनावरील तानही कमी झाला आहे. परंतु कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १९ वर पोहचला आहे. तालुक्यात आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. आज आणखी १२ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६२७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आज ५९ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १ पॉझिटिव्ह तर ५८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून तेराही चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १५ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३७ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत एकूण २०९९ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून २४९५ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. एकंदरीत ४५९४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या वाढतच असून आज आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या १९ झाली आहे. मृतांमध्ये एक मारेगाव तालुक्यातील असून एक सुंदरनगर येथील आहे. आज पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती भांडेवाडा येथील आहे. प्रशासनाच्या योग्य उपाययोजनांमुळे कोरोनाची व्याप्ती कमी होतांना दिसत असून नागरिकांनी प्रशासनास योग्य सहकार्य केल्यास तालुक्यातून कोरोना हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.