कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बसपाने अभिवादन सभेतून वाहिली आदरांजली
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याकरिता बसपाचे वणी विधानसभा अध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटन बांधणीवर चर्चा होऊन पक्षाची पुढील वाटचाल व धेय्य धोरणांची दिशा ठरवण्यात आली. यावेळी प्रवीण खानझोडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता सक्रिय होऊन जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याकरिता पुढाकार घेण्याबाबत मार्गदर्शन करतांनाच महापुरुषांच्या विचारांवर आधारित मानवतावादी समाज निर्माण करणे काळाची गरज असल्याचे सुतोवाच केले.
कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्ष कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कांशीरामजी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कांशीरामजी यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना करून बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे कारकर्ते तयार केले. पीडित शोषितांच्या उत्थानासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी या महापुरुषांची चळवळ अविरत सुरु ठेवली. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा आजही पक्ष सभासदांनी त्यांची प्रेरणा घेऊन अविरत सुरु ठेवला आहे. जण कल्याणाकरिता अख्ख आयुष्य वाहणाऱ्या कांशीरामजी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेण्याचा बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार केला. बसपाचे वरिष्ठ नेते दिलीप कोटरंगे यांनीही यावेळी मार्गदर्शनपर विचार मांडले. या अभिवादन सभेला बसपाचे जितेंद्र डाबरे, भीमराव कवाडे, मनोज जिवाने, अशोक अंकतवार, किसान कोरडे, सौरव वानखेडे, दीक्षांत भगत, महेश लिपटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.