WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर येथे कचराकुंड्या व घंटागाडी उपलब्ध करून देण्याची मागणी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील राजूर गावातील कचराकुंड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गावातील आठवडी बाजाराबरोबरच ठिकठिकांच्या कचरा कुंड्यांना तडे जाऊन त्या फुटल्याने कुंड्यांच्या बाहेर कचऱ्यांचे ढिगारे जमा झाले आहेत. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेंव्हा गावात मोठ्या स्वरूपाच्या ५० कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच गावातील केरकचऱ्याची कायम स्वरूपी समस्या सोडविण्याकरिता घंटागाडीची व्यवस्था करून देण्याची मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने ग्रामपंचायतेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे राजूर गाव समस्यांच्या विळख्यात आले आहे. कचराकुंड्या बाहेर पडलेला कचरा हवेने उडून गावभर पसरत असतानाच परत नागरिकांच्याच दारात जमा होतांना दिसत आहे. गावातील बहुतांश कचराकुंड्या तडा जाऊन फुटल्या आहेत. त्यामुळे कचराकुंड्या बाहेर कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहेत. आठवडी बाजार व मुख्य बाजाराबरोबरच रत्यालगतही कचऱ्याचे खच पाहायला मिळतात. जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळत असून जनावरे त्यावर उच्छाद घालत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच घाण कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे जनसंख्येचे गांव म्हणून राजुरची ओळख आहे. आज या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून समस्यांना तोंड देतांना नागरिकही वैतागले आहेत. आज साथीच्या रोगांनी सर्वत्र थैमान घातले असतांना गावात पसरलेली अस्वच्छता आजारांना आमंत्रण देत आहे. स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी असणारे प्रशासनच गावातील स्वच्छतेकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाला राजूर प्रशासन पूर्णतः बगल देत असल्याचे याठिकाणी पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यावरून पाहायला मिळत आहे. गाव स्वच्छ ठेवण्यावर भर देण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. लोकप्रतिनिधींनी व संबंधित अधिकाऱ्यांनी गावातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन गावात प्रत्येक ठिकाणी मोठ्या कचराकुंड्या उपलब्ध करून देतांनाच कायमस्वरूपी कचऱ्याची विल्लेवाट लावण्याकरिता घंटागाडीची व्यवस्था करण्याची मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजय कंडेवार व समाजसेविका आशा रामटेके यांनी राजूर ग्रामपंचायतेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share