तालुक्यात आढळले आज कोरोनाचे दोन रुग्ण
शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून मागील काही दिवसांपासून अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने एकीकडे दिलासा मिळाला असतांना दुसरीकडे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे. आज तालुक्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७२ झाली आहे. तर कोरोना बळींची संख्या २० वर पोहचली आहे. आज आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ झाली आहे.
शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांमधील भीती निवळत असतांनाच कोरोना बळींचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकही चिंतेत आले आहे. आनंद नगर मधील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या वाढून २० वर पोहचली आहे. आज २१ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून १ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १८ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात असून त्यामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आज आणखी १२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आल्याने ५८ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आज तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७२ झाली असून ६५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तो शहरात नातेवाईकाकडे आला असता त्याची प्रकृती बिघडल्याने त्याने स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. तसेच जैन ले-आऊट येथीलही एका व्यक्तीचा आज कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाला शहरातून हद्दपार करण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.